नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांत ऍमेझॉननं उद्योग जगतात नेत्रदीपक प्रगती काढली आहे. त्यामुळेच ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती झाले. त्यांची संपत्ती १८७ बिलियन डॉलर इतकी आहे. ऍमेझॉन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अतिशय कठोर असल्याचं समजतं. तशा बातम्यादेखील अनेकदा समोर आल्या आहेत. आता एक नवी घटना समोर आली. वारंवार वॉशरुमला जात असल्यानं ऍमेझॉननं एका महिलेला कामावरून कमी केलं.
एक महिला कर्मचारी कामाच्या वेळात वारंवार वॉशरुमला जायची. त्यामुळे तिला ऍमेझॉननं कामावरून काढलं. यानंतर महिलेनं ऍमेझॉनविरोधात न्यायालयात धाव घेतली. आपण इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचा सामना करत असल्यानं अनेकदा वॉशरुमला जावं लागत असल्याचा दावा महिलेनं केला आहे. आपण आपल्या वरिष्ठांना याची कल्पना दिली होती. त्यावर त्यांनी डॉक्टरांकडून प्रमाणपत्र आणण्यास सांगितल्याचं महिलेनं याचिकेत नमूद केलं आहे.
ऍमेझॉनच्या गोदामात काम करणाऱ्या मारिया जेनाईट ओलिवरोला तिच्या वरिष्ठांनी डॉक्टरांकडून प्रमाणपत्र आणण्यासाठी ५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र तिला प्रमाणपत्र आणण्यास वेळ लागला. त्यामुळे ५ दिवस उलटताच मारियाला कामावरून काढण्यात आलं. मात्र ६ दिवस डॉक्टरांकडून अपॉईंटमेंटच मिळाली नसल्याचा दावा मारियाच्या वकिलांनी केला. ऍमेझॉन कर्मचाऱ्यांसोबत भेदभाव करत असल्याचा आरोप करत मारियानं खटला दाखल केला आहे. तिनं ७५ हजार डॉलरची (जवळपास ५५ लाख रुपये) रक्कम नुकसान भरपाई म्हणून मागितली आहे.