ऑनलाइन लोकमत
बेंगळूर, दि. 8 - फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या कंपन्यांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी अॅमेझॉन या जगातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाइन रिटेलर कंपनीने भारतामध्ये आणखी 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. आत्तापर्यंत अॅमेझॉनने भारतात 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
भारतामधली सगळ्यात मोठी ऑनलाइन रिटेलिंग कंपनी बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट्य असून त्यासाठी डिस्काउंट्स, अत्याधुनिक दळणवळण व्यवस्था आणि अन्य बाबींमध्ये प्रचंड प्रमाणात नव्याने गुंतवणूक करण्यात येईल अशी चिन्हे आहेत.
बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या अमेरिकेतील एका समारंभात अॅमेझॉनचे चीफ एग्झिक्युटिव्ह जेफ बेझोज यांनी ही माहिती दिल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
जुलै 2014मध्ये अॅमेझॉनने भारतात 2 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याचे जाहीर केले होते. त्या आधी एकच दिवस फ्लिपकार्टने 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. त्यामुळे फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनमधलं बिझिनेस वॉर वाढणार असे संकेत मिळाले होते. आता अॅमेझॉनच्या नव्या 3 अब्ज डॉलर्सच्या गुतंवणुकीच्या घोषणेमुळे भारतीय बाजार अॅमेझॉन अत्यंत गंभीरपणे घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्याचप्रमाणे फ्लिपकार्ट व स्नॅपडीलसारख्या कंपन्यांना कडव्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार असल्याचेही उघड झाले आहे.
अशी झाली गुंतवणूक
रुपयामध्ये सांगायचे तर अॅमेझॉनने आत्तापर्यंत भारतात किमान 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मिंटने दिलेल्या माहितीप्रमाणे अॅमेझॉनचे भारतीय बाजारातील भांडवल 16 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. आणि नव्याने जाहीर झालेली गुंतवणूक सुमारे 21 हजार कोटी रुपयांची असेल.
फ्लिपकार्टने भारतीय बाजारात 2007 साली उडी घेतली तर स्नॅपडीलने 2010 मध्ये व्यवसाय सुरू केला. या तुलनेत अॅमेझॉनने भारतात खूप उशीरा म्हणजे 2013 मध्ये प्रवेश केला, परंतु अल्पावधीतच चांगला जम बसवला आहे.
किती मोठं आहे ऑनलाइन मार्केट
एका तज्ज्ञ कंपनीच्या अहवालानुसार 2014मध्ये भारतातील ई-कॉमर्सचा व्यवसाय 4.48 अब्ज डॉलर्स होता, जो 2020 पर्यंत 60 अब्ज डॉलर्सच्या घरात जाईल. चीनमध्ये अलिबाबा ग्रुप होल्डिंग कंपनीने अॅमेझॉनवर मात करत सगळ्यात मोठी ऑनलाइन रिटेलर कंपनी असं बिरुद मिळवलं आहे, त्यामुळे दुसऱ्या सगळ्यात मोठ्या बाजारपेठेत म्हणजे भारतात हे स्थान मिळवण्यास अॅमेझॉन उतावीळ आहे, हेच या नव्या गुंतवणुकीच्या घोषणेतून अधोरेखीत झाले आहे.