ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - ब-याच दिवसांपासून 'चंद्रवारी' किंवा 'चंद्रस्वारी' या विषयावरील फारशा काही बातम्या समोर आल्या नाहीत. म्हणजे 'चंद्र' विशेष असा चर्चेत नव्हता. पण आता ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉननं चंद्राला चर्चेत आणले आहे.
काही दिवसांपूर्वी 'स्पेसएक्स'ने ग्राहकांना चंद्रावर सहलीसाठी पाठवणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर आता थेट चंद्रापर्यंत सामानाची डिलिव्हरी करणार, अशी घोषणा 'अॅमेझॉन'ने केली आहे.
'नासाला अंतराळात कार्गो (विमान) पाठवण्याचे काम खासगी कंपन्यांद्वारे करावे लागले. 2020 सालापर्यंत एकाचवेळी जवळपास 4,500 किलो सामान चंद्रावर पोहोचवण्याची व्यवस्था सुरू व्हावी, अशी आमची इच्छा आहे', या नव्या प्रकल्पाबाबत बोलताना बेझॉस यांनी ही माहिती दिली.
'एकूणच आम्हाला चंद्रावर वसाहत निर्माण करणं आणि सामान पोहोचवण्याची व्यवस्था सुरू करायची आहे', असेही बेझॉस यांनी सांगितले. चंद्रावर कायमस्वरुपी वसाहत निर्माण करणं कठीण काम आहे, मात्र तेथे राहण्यासाठी लोकं प्रचंड उत्साहीतदेखील असतील.
नासा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यासंदर्भातील माहिती पाठवण्यात आली आहे. जर दोघांमध्ये संवाद होऊन या प्रकल्पावर एकमत झाले, तर लवकरच अॅमेझॉन स्पेसएक्सला टक्कर देईल व चंद्रावर सामान पाठवण्यास सुरुवात करेल.