इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांना नागरी न्यायालयात आव्हान अर्ज दाखल करण्याचा अधिकार देता यावा, यासाठी पाकिस्तानच्या संसदेमध्ये लष्करी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने घातलेल्या अटीनुसार ही कार्यवाही केली जात आहे. जाधव यांच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप आहे.गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तानच्या कारागृहात असलेल्या जाधव यांच्यासाठी ही सकारात्मक वृत्त आहे. पाकिस्तानच्या लष्करी कायद्यानुसार जे खटले लष्करी न्यायालयात चालवले जातात, ते नागरी न्यायालयात वर्ग केले जाऊ शकत नाहीत. जाधव यांना यातून सूट मिळावी, यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे.जाधव यांचा खटला नागरी न्यायालयात चालावा यासाठी कायद्यात बदल आवश्यक असेल, तर तोही करावा, असे स्पष्ट निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले होते. आमचा कायदा यासाठी परवानगी देत नाही, असे कारण दाखवण्याची संधीही पाकिस्तानला देण्यात आली नाही.>व्हिएन्ना कराराचे उल्लंघनएप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. भारताने शिक्षा रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. पाकिस्तानने जाधव यांच्या प्रकरणात व्हिएन्ना कराराचे मामले उल्लंघन केले आहे, असा दावा भारताने केला. आंतरराष्ट्रीय न्यायालयात दोन वर्षे दोन महिने हे प्रकरण चालले. त्यानंतर या न्यायालयाने या वर्षी जुलैमध्ये भारताच्या बाजूने निर्णय दिला.जाधव यांच्यासाठी विनाविलंब सर्व कायदेशीर प्रक्रिया केली जावी आणि त्याला आवश्यक असा संसदीय बदलही करावा, असे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जुलै महिन्यात दिले होते.
कुलभूषण जाधवसाठी पाकिस्तानच्या लष्करी कायद्यात होणार दुरुस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 4:25 AM