Israel Hamas War: गेल्या ४० दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर शेकडो जणांना ओलीस ठेवले होते. या ओलीस ठेवलेल्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत युद्ध थांबणार नाही. युद्धविराम किंवा माघार नाही, अशी ठाम भूमिका इस्रायलने घेतली आहे. मात्र, यातच आता गाझापट्टीतील रुग्णालयाच्या खालीच हमासने बंकर आणि शस्त्रास्त्रांचा साठा केल्याची माहिती समोर येत आहे. इस्रायलनंतर आता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात हमासची पोलखोल केली आहे.
इस्रायलच्या सैन्याने गाझापट्टीतील हमासच्या तळांवर हवाई हल्ले आणि जमिनीवर कारवाई सुरूच ठेवली आहे. इस्रायलने गाझामधील काही रुग्णालयांजवळही लष्करी कारवाई केली. हमास आपल्या कारवायांसाठी आणि ओलीस ठेवण्यासाठी गाझामधील रुग्णालयांचा वापर करत आहे, असा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. इस्रायलच्या या दाव्याला अमेरिकेने पुष्टी दिली आहे.
गाझापट्टीतील काही रुग्णालये यांचा वापर कारवाया करण्यासाठी केला जातोय
आमच्याकडे अशी माहिती आहे की, हमास आणि पॅलेस्टिनी जिहादी गाझापट्टीतील काही रुग्णालये यांचा वापर कारवाया करण्यासाठी आणि ओलीस ठेवण्यासाठी वापरत आहेत. यात अल शिफा रुग्णालयाचा समावेश आहे. रुग्णालयांच्या खाली बंकर आहेत. हमास गाझा शहरातील अल शिफा रुग्णालयातून कमांड आणि कंट्रोल करतात. त्यांच्याकडे शस्त्रे आहेत. इस्रायल अशा कारवायांना प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहेत, असे पेंटागनकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, हमासने गाझापट्टीत बोगदे, बंकर जाळे तयार केले आहे. इस्रायल लष्कर हमासने बांधलेल्या या ठिकाणांना 'गाझा मेट्रो' असे संबोधते. हमासने गाझामध्ये २५०० हून अधिक बोगदे बांधले आहेत. हमासचा दावा आहे की, त्यांचे भूमिगत जाळे ५०० किलोमीटरवर पसरले आहे. ज्यांचे अॅक्सेस पॉइंट काही इमारतींमध्ये आणि अनेक शाळा, मशिदी आणि हॉस्पिटलमध्ये आहेत. शस्त्रास्त्र आणि दारूगोळा सुरक्षित ठेवण्यासाठी हमास या बोगद्यांचा वापर करत असून, कमांड आणि कंट्रोल सेंटर बांधले आहे. इस्रायलने याबाबत मोठा खुलासा करत रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये हा सगळा प्रकार चालत असल्याचे म्हटले होते.