बीजिंग : दक्षिण चीन समुद्रात आमची एक युद्धनौका आली तेव्हा चीनच्या नौदलाचे जहाज अव्यावसायिक सराव करीत होते, असा आरोप अमेरिकेने चीनवर केला आहे. चीनने मंगळवारी यावर तीव्र असमाधान व्यक्त करून अमेरिकेने युद्धनौका दक्षिण चीन समुद्रातील बेटांनजीक नांगरण्याला ठाम विरोध केला आहे. दक्षिण चीन समुद्रात अमेरिका व चीनची लढाऊ जहाजे समोरासमोर उभी ठाकल्यानं युद्धाचा प्रसंग निर्माण झाला होता.चीनच्या या मुजोरीमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून, अमेरिकेनं चीनला गंभीर इशारा दिला आहे. चीन शेजारील देशांना न जुमानता वारंवार सामुद्री सीमांचे भंग करत आहे. चीन स्वतःच्या सीमेपेक्षा बराच बाहेर आल्याचा अमेरिकेनं दावा केला आहे. चीनच्या या मुजोरीवर शेजारील देशांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दक्षिण चीन समुद्रातील मक्तेदारीवरून चीन, तैवान, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया आणि ब्रनेई यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. चीननं दक्षिण चिनी समुद्रात कृत्रिम बेटे उभारून तिथे सैन्य तैनात केलं आहे. दक्षिण चिनी समुद्रावर चीन वारंवार हक्क सांगत असून, शेजारील देशांनीही चीनच्या या हुकूमशाही पद्धतीविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
दक्षिण चीन समुद्रात तणाव वाढला! चीन-अमेरिकेच्या युद्धनौका आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 9:58 AM