वॉशिंग्टनः चीन कोरोना विषाणूची लस आणि उपचारांशी संबंधित माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अमेरिकन एजन्सी फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी केला आहे. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी मंत्रालयानं चिनी हॅकर्सविरुद्ध सतर्कतेचा इशारा दिला आहे.सार्वजनिक सतर्कतेचा मसुदा तयार करण्यात आला आहे आणि येत्या काही दिवसांत तो सार्वजनिक करण्यात येणार आहे. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, चीनचे हॅकर्स कोरोना रुग्णांचे उपचार, तपासणी आणि लसीशी संबंधित डेटा आणि महत्त्वाची बौद्धिक संपत्ती चोरण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच हे हॅकर्स चिनी सरकारशी संबंध असल्याचंही सांगितलं जात आहे.ट्रम्प प्रशासनाच्या माजी आणि विद्यमान अधिका-यांनी सांगितले की, कोरोना (साथीच्या रोगाचा) लस निर्मितीमध्ये देशातील सरकारी आणि खासगी कंपन्यांचा सहभाग असल्याने हा इशारा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी या लस निर्मितीसाठी प्रयत्नशील असलेल्या कंपन्यांना इराण, उत्तर कोरिया, रशिया आणि चीनमधील हॅकर्सबद्दल सतर्कता बाळगण्याची सूचना दिली आहे. अमेरिकन सुरक्षा एजन्सी सायबर हल्ल्यांविरुद्ध मोहीम राबवू शकते. या एजन्सींमध्ये पेंटागॉन सायबर कमांड आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचा समावेश आहे.गेल्या आठवड्यातच युनायटेड किंगडम आणि अमेरिकेने एक संयुक्त संदेश जारी केला होता, त्यामध्ये आरोग्यसेवेशी संबंधित लोकांना सायबर हल्ल्यांविरुद्ध सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं होतं. अमेरिका दीर्घ काळापासून कोरोना विषाणूची उत्पत्ती वुहानमध्ये झाल्याचा चीनवर आरोप करीत आहे. चीनने प्रथम जगभरात कोरोना पसरविला आणि त्यातून उद्भवणार्या परिस्थितीचा फायदा घेत असल्याचा आरोपही ट्रम्प प्रशासनाने केला. कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत झाली आहे आणि अमेरिकेकडे यासंदर्भात पुरेसे पुरावे आहेत, असंही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी सांगितले होते.
CoronaVirus News : चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 7:30 AM
अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी मंत्रालयानं चिनी हॅकर्सविरुद्ध सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ठळक मुद्देचीन कोरोना विषाणूची लस आणि उपचारांशी संबंधित माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे.एफबीआय आणि होमलँड सिक्युरिटी मंत्रालयानं चिनी हॅकर्सविरुद्ध सतर्कतेचा इशारा दिला आहे.सार्वजनिक सतर्कतेचा मसुदा तयार करण्यात आला आहे आणि येत्या काही दिवसांत तो सार्वजनिक करण्यात येणार आहे.