ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 28 - उत्तर कोरियासोबत न्यूक्लिअर आणि मिसाईल प्रोगामवरुन मोठा वाद होण्याची भीती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. मात्र या वादातून राजनयिक तोडगा निघावा अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. उत्तर कोरियाची घातक शस्त्रास्त्र निर्मितीची क्षमता वाढत चालल्याने अमेरिकेची चिंता वाढली आहे. त्यामुळेच अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला उत्तर कोरियाचा अणवस्त्राचा प्रश्न लवकर निकाली काढण्याची घाई झाली आहे. गुप्तचरांकडून अमेरिकेला जे अहवाल मिळालेत त्यानुसार दर सहा ते सात आठवडयाला एका अणूबॉम्बची निर्मिती करण्याची क्षमता उत्तर कोरियामध्ये आहे.
"उत्तर कोरियासोबत खूप मोठा वाद होण्याची शक्यता असल्याची आपल्याला खात्री आहे", असं डोनाल्ड ट्रम्प बोलले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्विकारुन 100 दिवस पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर रॉयटर्सने घेतलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
"तरीसुद्धा आम्हाला शांतीच्या मार्गाचा अवलंब करत या मुद्द्यावर तोडगा निघावा असं वाटत आहे. मात्र ते फारच कठीण आहे", असं डोनाल्ड ट्रम्प बोलले आहेत.
यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या मुद्यावरुन चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांचं कौतुक केलं. शी जिनपिंग एक चांगले व्यक्ती असून, युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सतत प्रयत्न करत असल्याचं बोलले आहेत.
उत्तर कोरियाचा अणवस्त्र कार्यक्रम आंतरराष्ट्रीय तज्ञांना पाहणीसाठी खुला नसल्याने नेमके त्यांच्या क्षमतेचे मुल्यमापन करणे एक आव्हान आहे. अमेरिकेचा जो अंदाज आहे त्यापेक्षा जास्त गती उत्तर कोरियाकडे असेल तर ती धोक्याची घंटा असल्याने ट्रम्प प्रशासनातील अधिका-यांचे मत आहे. त्यामुळे अमेरिकेला उत्तर कोरियाचा विषय निकाली काढण्याची घाई झाली आहे.
यापूर्वीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी उत्तर कोरियाला धमकी दिली आहे पण कधी थेट कारवाई केलेली नाही. उत्तर कोरियाचाही शक्तीशाली बॉम्ब आणि क्षेपणास्त्राच्या चाचण्या करुन अमेरिकेला डिवचण्याचा प्रयत्न असतो. उत्तर कोरियाने आता आणखी एक अणवस्त्र चाचणीची धमकी दिली असून, 11 वर्षातील ही सहावी चाचणी असेल.
उत्तर कोरियाने अशी चाचणी केल्यास अमेरिकेकडून आणखी कठोर निर्बंध लावले जाऊ शकतात. ट्रम्प यांनी अलीकडेच रासायनिक हल्ल्यासाठी वापरलेल्या सीरियातील हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा आदेश दिला तर, अफगाणिस्तानमध्ये सर्वात मोठा बॉम्ब हल्ला केला होता.