वॉशिंग्टन : गेल्या सात दशकांपेक्षा यंदा अमेरिकेला आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल, अशी भीती अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच, कोरोना व्हायरसचे सावट पुन्हा येईल आणि अर्थव्यवस्थेसमोर हे मोठे संकट उभे राहील, अशीही चिंता अर्थशास्त्रज्ञांना वाटते.
नॅशनल असोसिएशन फॉर बिझिनेस इकॉनॉमिक्सने (एनएबीई) सोमवारी जाहीर केलेल्या या संदर्भातील सर्वेक्षणाची आकडेवारी सोमवारी जाहीर झाली. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे अमेरिकेतील जीडीपीत 2020 मध्ये 5.9 टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज आहे. जीडीपीत होणारी ही घट 1946 सालानंतरची सर्वाधिक जास्त असणार आहे. त्यावेळी दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या जीडीपीमध्ये 11.6 टक्क्यांनी घट झाली होती.
एनएबीईच्या 48 तज्ज्ञांच्या पथकाने असा अंदाज लावला आहे की, जानेवारी ते मार्च या तिमाहीत अमेरिकेच्या जीडीपीमध्ये पाच टक्क्यांनी घट होईल. त्यानंतर एप्रिल ते जून या तिमाहीत ही घसरण 33.5 टक्के होईल.
2020 च्या दुसऱ्या सहामाहीत विकास दर अधिक चांगला राहील, असा एनएबीईच्या पथकाचा सध्याचा अंदाज आहे. तसेच, जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत तो 9.1 टक्के आणि ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 6.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. याचबरोबर, 2021 मध्ये अमेरिकेचा विकास दर 3.6 टक्के असेल, असा या अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
दरम्यान, अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अमेरिकेतील १९ लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही अमेरिकेत लक्षणीय आहे.