जगभरात कोरोनाचा हाहकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. जॉन हापकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाने आतापर्यंत 44.15 लाख लोकांचा बळी गेला आहे. तर 21.07 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहेत. अमेरिकेसारखा प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाला आहे.
अमेरिकेत कोरोनाचा वेग पुन्हा वाढला आहे. अमेरिकेत संसर्ग झालेल्यांची संख्या 3.76 कोटींहून अधिक झाली आहे तर साथीमुळे 6.27 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत या प्राणघातक व्हायरसचा कहर वाढला असून लहान मुलांना अधिक धोका आहे. कोरोनाग्रस्त चिमुकल्यांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. सध्या अमेरिकेत दररोज 1.5 लाखांहून अधिक नवीन संक्रमित आढळत आहेत. यावेळी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णालयातही परिस्थिती गंभीर आहे.
अमेरिकन आरोग्य संस्था सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) ने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाबाधित मुलांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण उच्च पातळीवर पोहोचले आहे. सीडीसीच्या मते, रुग्णालयांमध्ये 30 ते 39 वयोगटातील आणि 18 वर्षांखालील मुलांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व वयोगटातील रुग्णांची संख्या अजूनही जानेवारीच्या तुलनेत कमी आहे. सध्या, दररोज सरासरी 11 हजारांहून अधिक नवीन रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत.
रशियामध्ये कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाली असूनही, कोरोनाने जीव गमावलेल्या लोकांची संख्या कमी होत नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियामध्ये गेल्या 24 तासांत 21,000 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 797 लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, रशियामध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या 6,726,523 पर्यंत पोहोचली आहे तर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 175,282 वर पोहोचली आहे. रशियातील मॉस्कोमध्ये वाईट परिस्थिती झाली आहे. मॉस्कोमध्ये एका दिवसात 1,852 नवीन रुग्ण आढळून येत आहेत.
ब्राझीलमध्ये, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33,887 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 870 लोकांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीसह, ब्राझीलमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या 20,528,099 झाली आहे तर 573,511 लोकांचा साथीमुळे मृत्यू झाला आहे. संक्रमित लोकांच्या बाबतीत ब्राझील आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. मृतांच्या आकडेवारीत ब्राझील जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या आणि मृतांच्या आकडेवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.