सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाने (डीसी) सोमवारी मार्क झुकरबर्ग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. केंब्रिज अॅनालिटिका घोटाळ्यात वैयक्तिकरित्या जबाबदार धरत मार्क झुकरबर्ग यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, कोट्यवधी फेसबुक युजर्सच्या डेटाच्या गोपनीयतेच्या उल्लंघनाशी संबंधित हे प्रकरण एक मोठा कॉर्पोरेट आणि राजकीय घोटाळा असल्याचे म्हटले जात आहे.
डीसीचे अॅटर्नी जनरल कार्ल रेसिन यांनी डीसी सुपीरिअर कोर्टात मार्क झुकरबर्ग यांच्याविरोधात दिवाणी दावा दाखल केला. कंपनीच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मार्क झुकरबर्गचा थेट सहभाग असल्याचा आरोप आहे. केंब्रिज अॅनालिटिका या डेटा कलेक्शन कंपनीच्या बाबतीत युजर्सची माहिती शेअर करण्याचे संभाव्य धोकेही त्यांना माहीत होते. तसेच, केंब्रिज अॅनालिटिकाचे कमीत कमी 8.70 कोटी फेसबुक युजर्सचा डाटा त्यांच्या परवानगीशिवाय गोळा केला आणि अमेरिकेतील 2016 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर कथितपणे प्रभाव टाकण्यासाठी याचा वापर करण्यात आला होता, असा आरोपही मार्क झुकरबर्ग यांच्यावर करण्यात आला आहे.
फेसबुक युजर्सची संख्या तीन अब्जांच्या पुढेखटल्यात सादर केलेल्या तथ्यांनुसार, "फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग 2012 पासून त्यांच्या बोर्डाचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडे फेसबुकचा 50 टक्क्यांहून अधिक वोटिंग शेअर आहे. जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट कंपनीच्या कामकाजावर त्यांचे संपूर्ण नियंत्रण आहे." दरम्यान, जगभरात फेसबुक युजर्सची संख्या तीन अब्जांच्या पुढे गेली आहे. मेटाचे बाजार मूल्य 500 अब्ज डॉलर पेक्षा जास्त अंदाजे आहे. रेझिनने झुकरबर्ग यांच्याकडून नुकसान भरपाई आणि दंड मागितला आहे, जो चाचणी दरम्यान निश्चित केला जाईल. मेटा प्लॅटफॉर्मचे प्रवक्ते अँडी स्टोन यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मेटा ही फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी आहे.