वॉशिंग्टन : खाडी क्षेत्रामध्ये अमेरिकेच्या नौसेनेने इराणचे ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. काही आठवड्यांपूर्वीच इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडले होते. यावरून अमेरिकेच्या अध्यक्षांनी इराणवर हल्ल्याचा आदेशही दिला होता. मात्र, लगेगच हा आदेश मागे घेण्यात आला होता. तर अमेरिकेने ड्रोन पाडल्याच्या आरोपाचे इराणने खंडन केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, हॉर्मूज खाडीमध्ये प्रवेश करणाऱ्या अमेरिकेच्या युद्धनौकेला धोका निर्माण झाला होता. यामुळे इराणचे ड्रोन पाडण्यात आले आहे. यामुळे गेल्या आठवड्यात शांत झालेल्या खाडी क्षेत्रामध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.
असॉल्ट युद्धनौका USS बॉक्सरने इराणी ड्रोनविरोधात संरक्षणात्मक भूमिका घेतली. कारण हे ड्रोन विमान युद्धनौका आणि त्यावरील सैनिकांना आव्हान देत होते. 1000 यार्डसच्या आत येताच हे ड्रोन पाडण्य़ात आले. ट्रम्प यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय हद्दीत जहाजांविरोधात इराणने अनेकदा शत्रुत्वपूर्ण कारवाई केली आहे. ही घटना त्यातील ताजी आहे. अमेरिकेकडे आपले लोक आणि हितांचे रक्षण करण्याचा अधिकार आहे.
तर अमेरिकेच्या या आरोपांवर इराणने उत्तर देताना, आपल्याकडे अद्याप ड्रोन पाडल्याची माहिती आलेली नाही. इराणचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी मोहम्मद जरीफ यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते युएनच्या मुख्यालयामध्ये महासचिवांशी चर्चा करण्यासाठी आले आहेत.