US Attack on Houthis: इराण समर्थित हुथी बंडखोरांवर अमेरिकेचे हल्ले सुरूच आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुथी बंडखोरांवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला आहे.हा व्हिडिओ केवळ राजकीय दृष्टिकोनातूनच नाही तर जागतिक रणनीतीच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरला आहे. लक्ष्यावर हल्ला करुन क्षणार्धात संपूर्ण परिसर धुळीच्या आणि धुराच्या साम्राज्यात बदलल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ड्रोन हल्ल्यात २५ सेकंदात ७० ते ८० हुथी बंडखोर मारले गेले आहेत.
येमेनमध्ये अमेरिकेचे हवाई हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक हुथी बंडखोर मारले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. २५ सेकंदाच्या व्हिडिओ काही लोक एका वर्तुळात उभे असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर अचानक त्यांच्यावर हल्ला होतो. हल्ल्यानंतर मोठा स्फोट झाल्यानंतर केवळ धूर दिसत होता.
या व्हिडीओसोबत ट्रम्प यांनी कॅप्शन देखील दिले आहे. "हे हुथी बंडखोर हल्ला करण्यासाठी एकत्र आले होते. अरेरे, आता या हुथी बंडखोरांकडून कोणताही हल्ला होणार नाही! ते पुन्हा कधीही आमची जहाजे बुडवणार नाहीत!," असं ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बॉम्ब फेकणाऱ्या फायटर जेटमधून हा २५ सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. ७० ते ८० लोक जमिनीवर गोल वर्तुळात उभे असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. बॉम्ब टाकण्यासाठी वर्तुळाचा मध्यभाग निवडण्यात आला. विमानातून काही सेकंदांनंतर बॉम्ब टाकला. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि धुराचे लोट दिसू लागले. काही वेळाने तिथे एकही माणूस दिसत नाही. फक्त त्या ठिकाणी खोल खड्डा दिसतो. यावरून सर्व हुथी बंडखोरांचा एकाच फटक्यात खात्मा करणारा हा बॉम्ब किती शक्तिशाली होता याचा अंदाज लावता येतो.
काही आठवड्यापूर्वीपासून येमेनमधील बंडखोर गटांवर अमेरिकेने अनेक हल्ले सुरु केले आहे. हुथी बंडखोरांच्या गटाने लाल समुद्रातील जहाजांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले. बुधवारी येमेनमधील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात अमेरिकेने हल्ला केला होता. ज्यामध्ये सुमारे सहा हुथींना ठार झाल्याचे समोर आलं.