वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या प्रचारात काही नेत्यांनी केलेली मुस्लिमविरोधी वक्तव्ये ‘अक्षम्य’ असल्याचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले असून, अमेरिका इस्लामला दडपत नाही हे दाखवून देणेच दहशतवादाचा मुकाबला करण्याची सर्वात चांगली पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.मेरिलँडमधील बाल्टीमोर येथील एका मशिदीत मुस्लिम समुदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, अमेरिका इस्लामला दडपत नाही, हे जगाला दाखवून देणे आणि याबाबतच्या प्रचाराचा इन्कार करणे हाच दहशतवादाशी लढा देण्याचा उत्तम मार्ग आहे.अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ओबामा यांनी प्रथमच एका मशिदीला भेट देऊन मुस्लिम समुदायाला संबोधित केले. त्यात त्यांनी अलीकडेच काही नेत्यांनी केलेल्या मुस्लिमविरोधी वक्तव्यांचा उल्लेख केला. ओबामा म्हणाले की, अमेरिका एखाद्या धर्माविरुद्ध कट्टर धोरण स्वीकारणार नाही. तसे झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. एखाद्या धर्मावरील हल्ला हा सर्व धर्मावरील हल्ला केला जाण्याचा प्रकार होईल. जेव्हा एखाद्या समूहाला निशाणा बनविले जाते तेव्हा अमेरिकी नागरिकांनी आवाज उठविला पाहिजे. आम्ही सर्वच धर्मांचा आदर केला पाहिजे. कोणत्याही धर्माला मानण्याचे आम्हाला स्वातंत्र्य आहे.ओबामा म्हणाले की, संपूर्ण मुस्लिम समुदायासाठी आताची स्थिती चिंताजनक आहे. थोडे स्पष्टच सांगावयाचे झाल्यास स्थिती भयभीत करणारी आहे. सर्व अमेरिकी नागरिकांप्रमाणे आपण सर्वजण दहशतवादाच्या धोक्याने चिंतित आहात. मूठभर लोक हिंसाचार करतात आणि त्यासाठी संपूर्ण समुदायाला दोषी ठरविले जाते. त्यातही आपण अमेरिकी नागरिक असल्याने चिंता वाढली आहे. शीख अमेरिकनांचाही फरपट होतेय. ते मुस्लिम आहेत, असे समजले जात असल्यामुळे त्यांना वारंवार लक्ष्य केले जाते आणि त्यांचा छळ होतो, असे बराक ओबामा यांनी यावेळी मान्य केले.
अमेरिका इस्लामला दडपत नाही : ओबामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2016 3:14 AM