America Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याप्रमाणे 'तोशाखाना' सारख्या घोटाळ्याचा आरोप लागला आहे. ट्रम्प यांनी अध्यक्ष असताना परदेशी नेत्यांकडून मिळालेल्या 250,000 डॉलर (2.06 कोटी रुपये) किमतीच्या भेटवस्तू उघड न केल्याचा आरोप आहे. या भेटवस्तूंमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिलेल्या भेटवस्तूंचाही समावेश आहे.
अमेरिकन काँग्रेसच्या डेमोक्रॅट समितीने दिलेल्या अहवालात ट्रम्प यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. ट्रम्प यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या सुमारे 100 विदेशी भेटवस्तूंचा खुलासा केला नसल्याचा आरोप आहे. त्या वस्तुंची किंमत 250,000 डॉलर्स आहे. रिपोर्टनुसार, ट्रम्प कुटुंबाला त्यांच्या भारत भेटीदरम्यान एकूण 17 भेटवस्तू मिळाल्या. त्यांची किंमत 47,000 यूएस डॉलर होती. यामध्ये योगी आदित्यनाथ यांची $ 8,500 ची फुलदाणी, $ 4,600 चे ताजमहालचे मॉडेल, माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिलेला $ 6600 किमतीचा भारतीय गालिचा, पंतप्रधान मोदी यांनी दिलेले $ 1900 चे कफलिंक यांचा समावेश आहे.
ट्रम्प हे 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष होते''सऊदी स्वार्ड, इंडियन ज्वेलरी अँड अ लार्जर दॅन लाइफ साल्वाडोरन पोर्ट्रेट ऑफ डोनाल्ड ट्रम्प: द ट्रम्प अॅडमिनिस्ट्रेशन फेलियर टू डिसक्लोज मेजर फॉरन गिफ्ट'' असे या रिपोर्टचे शीर्षक आहे. डेमोक्रॅट समितीने केलेल्या प्राथमिक तपासात असे समोर आले की, ट्रम्प अध्यक्ष असताना परदेशी सरकारी अधिकाऱ्यांना या भेटवस्तुंची माहिती देण्यात अपयशी ठरले. परदेशी भेटवस्तू आणि सजावट कायद्यांतर्गत त्यांनी तसे करायला हवे होते. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे नेते असून, 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष होते.
इम्रान खान अशाच एका प्रकरणात अडकलेपाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाही अशाच तोशाखाना प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी पाकिस्तान निवडणूक आयोगाने इम्रान खान यांचे संसद सदस्यत्व रद्द केले असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. खान यांनी पंतप्रधान असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे.
काय आहे तोशाखाना प्रकरण?तोशाखाना हा पाकिस्तानी मंत्रिमंडळाचा एक विभाग आहे, जिथे इतर देशांचे सरकार, राष्ट्रप्रमुख आणि परदेशी पाहुण्यांनी दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू ठेवल्या जातात. नियमानुसार इतर देशांच्या प्रमुखांकडून किंवा मान्यवरांकडून मिळालेल्या भेटवस्तू तोशाखान्यात ठेवणे आवश्यक असते. 2018 मध्ये इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. विविध देशाकडून त्यांना महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्या वस्तू इम्रानने तोशाखान्यात जमा केल्या होत्या, पण नंतर त्या स्वस्तात विकत घेऊन भरघोस नफ्यात विकल्याचा आरोप इम्रानवर आहे.