ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 30 - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॅकिंगच्या माध्यमातून घुसखोरी करणा-या रशिया विरोधात अमेरिकेने कारवाईचे पहिले पाऊल उचलले आहे. अमेरिकेने रशियन दूतावासातील 35 राजनैतिक अधिका-यांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहे. हे राजनैतिक अधिकारी गुप्तचराचे काम करत असल्याने त्यांना अमेरिका सोडण्यास सांगितल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
रशियाकडून अमेरिकन दूतावासातील अधिका-यांचा छळ केला जातो त्याला हे उत्तर असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. ही कारवाई इथपर्यंतच मर्यादीत रहाणार नाही यापुढेही उत्तर दिले जाईल असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. रशियाप्रमाणे अमेरिकाही रशियन संगणकांवर सायबर हल्ला करु शकते. रशियानेही अमेरिकेच्या कारवाईला उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. ओबामा प्रशासनचा पराभव झाला आहे असे रशियाने सांगितले.
अमेरिकेकडून रशियावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर हे निर्बंधही हटवले जातील. अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत रशियन हॅकर्सनी डेमोक्रॅटीक पक्ष आणि हिलरी क्लिंटन यांच्या संगणकातील महत्वाची माहिती हॅक केली. याच माहितीला आधार बनवून डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली. ज्यामुळे ट्रम्प यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.