America Fire : अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. ही कॅलिफोर्नियापर्यंत पसरली असून, आगीमुळे शेकडो घरांची राख झाली आहे. विशेष म्हणजे, हॉलिवूड हिल्सवरही आगीचा मोठा भडका उडाला आहे. आगीच्या विळख्यात येथे राहणाऱ्या अनेक हॉलिवूड कलाकारांची घरे आली आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एक आलिशान बंगला जळताना दिसते.
आगीच्या भक्ष्यस्थानी आलिशान हवेलीमिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये जळणाऱ्या बंगल्याची किंमत $ 35 मिलियन (सूमारे 300 कोटी रुपये) असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये हवेली चारही बाजूंनी आगीच्या विळख्यात वेढलेली दिसतेय. या दृश्याने लॉस एंजेलिसच्या जंगलातील आगीची भीषणता अधोरेखित होते. विशेष म्हणजे, मंगळवारपासून पसरलेल्या या आगीने शहरातील अनेक भागांना वेढले आहे. या आगीत अनेक घरांची राख झाली आहे.
लॉस एंजेलिसमध्ये विध्वंसहॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या लॉस एंजेलिसला या वणव्यांचा मोठा फटका बसला आहे. आगीने पॅसिफिक पॅलिसेड्स, पासाडेना, अल्ताडेना आणि हॉलीवूड हिल्स सारख्या भागांना वेढले आहे. सांता अॅना वाऱ्यांमुळे आग वेगाने पसरत आहे. या आगीमुळे आतापर्यंत किमान अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून एक लाखाहून अधिक लोकांना घरे सोडावी लागली आहेत. आगीमुळे जवळपास 1,500 इमारती नष्ट झाल्या आहेत, तर 108 स्क्वेअर किलोमीटर पेक्षा जास्त परिसर राख झाला आहे.
सेलिब्रिटींच्या घरांवरही परिणाम झालाआगीचा फटका बसलेल्या भागात पॅसिफिक पॅलिसेड्स आणि हॉलीवूड हिल्समधील अनेक सेलिब्रिटींच्या घरांचाही समावेश आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये बऱ्याच दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे या भागात कोरडी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे जंगलातील आग वेगाने पसरू लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान रात्रंदिवस झटत आहेत, मात्र जोरदार वाऱ्यामुळे ती आटोक्यात आणणे कठीण जात आहे. चार दिवसांपासून सतत धगधगत असलेल्या या आगीने अनेक भागांमध्ये ‘बॉम्बस्फोट’ सारखी परिस्थिती बनली आहे.