वॉशिंग्टन : ‘अमेरिका फर्स्ट’... चला आपण सर्व मिळून अमेरिका सामर्थ्यशाली, समृद्ध, गौरवशाली आणि सुरक्षित व महान राष्ट्र बनवू या, अशी साद घालत अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पृथ्वीवरील दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याचा निर्धार व्यक्त केला. निव्वळ पोकळ गप्पा ठोकण्याचा काळ आता संपला असून प्रत्यक्षात कृतीचे पर्व आता आले आहे, असा आशावादही त्यांनी दिला.‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाचा पुनरूच्चार करीत ते म्हणाले की, अमेरिकी कर्मचारी, कामगार आणि अमेरिकी कुटुंबियांसाठी लाभदायी निर्णय घेतले जातील. कोणीही दुर्लक्षित राहणार नाही. अमेरिकी जनताच राज्यकर्ती बनली, म्हणून २० जानेवारी २०१७ हा दिवस स्मरणात राहील. अमेरिकी उत्पादनांची खरेदी आणि अमेरिकी लोकांसाठी रोजगार, हे दोन नियम आम्ही कटाक्षाने पाळणार आहोत. सर्व मिळून जगरहाटीत अमेरिकाच सर्वांत प्रथम असेल, असे अमेरिकचे भाग्य ठरवू या, असे सांगत अध्यक्ष म्हणून राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्या भाषणात ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’चा आमच्या सरकारचा मुख्य मंत्र असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्राची नव्याने उभारणी करण्याचा शब्द देत ट्रम्प म्हणाले की, या पृथ्वीतलावरून इस्लामिक दहशतवाद संपविण्याचा निर्धार व्यक्त केला. अन्य देशांवर हुकूमत लादण्याची आमची इच्छा नाही, असा आश्वासक शब्दही त्यांनी उभ्या जगाला दिला. सोळा मिनिटांच्या भाषणात त्यांनी भविष्यातील आव्हानांचा उल्लेख केला. अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. परंतु, आम्ही ध्येय जरुर गाठू, असा अशावादही त्यांनी व्यक्त केला.जनतेला वाटा मिळाला नाही...वॉशिंग्टन समृद्ध झाले; परंतु, जनेतला या संपत्तीमधील वाटा मिळाला नाही. राजकारणी समृद्ध झाले; पण रोजगार गेले. कारखाने बंद पडले. अस्थापनांनी आपले संरक्षण केले. परंतु, अमेरिकी जनता वाऱ्यावरच राहिली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
अमेरिका फर्स्ट !
By admin | Published: January 21, 2017 5:12 AM