गेल्या १ महिन्यापासून रशिया-यूक्रेन(Russia Ukraine) यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात पुतिन सातत्याने अणुहल्ल्याची धमकी देत आहेत. आता उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचणीच्या बातम्यांमुळे अमेरिकेचं(America) टेन्शन वाढलं आहे. अशा परिस्थितीत त्यांनी आपली सर्वात धोकादायक विमानवाहू युद्धनौका USS अब्राहम लिंकन कोरियन बेटावर पाठवली आहे अशी बातमी एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने पुढे आली आहे.
उत्तर कोरियाने(North Koria) इंटर कॉन्टिनेंटल न्यूक्लियर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. 'WION' च्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियाच्या मीडियाने असेही म्हटले आहे की, जहाज तेथे तैनात करण्यात आली आहेत. हे जहाज सध्या दक्षिण कोरियातील उल्सान शहराच्या पूर्वेस आंतरराष्ट्रीय पाण्यात आहे. दुसरीकडे, वृत्तसंस्था रॉयटर्सने नमूद केले की, जहाजांचा ताफा जपानच्या समुद्रात आहे, ज्याला पूर्व समुद्र देखील म्हणतात. या भागात जपानी सैन्यासोबत लष्करी सराव केला जात आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
१५ एप्रिल रोजी चाचणी होऊ शकते
१५ एप्रिल रोजी सुट्टीचा दिवस साधत उत्तर कोरिया आपल्या पहिल्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करू शकते असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने सांगितल्यानंतर अमेरिकेने हे पाऊल उचलले. २०१७ नंतर पहिल्यांदाच दक्षिण कोरिया आणि जपानमधील समुद्रात युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत.
युद्धनौका ३ ते ५ दिवस राहणार
त्या वर्षी यूएसएस रोनाल्ड रेगन, थिओडोर रुझवेल्ट आणि निमित्झ उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र चाचणी मोहिमेतंर्गत अहवालांदरम्यान तैनात करण्यात आले होते. दक्षिण कोरियाच्या योनहाप वृत्तसंस्थेने सूत्रांचा हवाला देत सांगितले की, यूएसएस अब्राहम लिंकन या भागात ३ ते ५ दिवस कार्यरत असेल. संरक्षण मंत्रालयाने पुष्टी केली आहे युद्धनौका सध्या देशाजवळील आंतरराष्ट्रीय पाण्यात आहे, परंतु अधिक तपशील दिलेला नाही असं अरिरांगच्या अहवालात म्हटले आहे.
किंम जोंग यांनी घेतला फायदा
अमेरिकेसोबत दीर्घ काळापासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरिया आपली अण्विक ताकद वाढवत असल्याचं म्हटलं जात आहे. उत्तर कोरियाचे ICBM हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून ते अमेरिकेतही विनाश घडवण्यास सक्षम आहे. रशिया-युक्रेन युद्धावर अमेरिका आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असताना उत्तर कोरियाने आपल्या चाचण्या वाढवल्या आहेत.