वॉशिंग्टन : रासायनिक गॅस हल्ल्यात लहान मुले व काही महिलांसह ८0 लोक मरण पावल्यानंतर अमेरिकेने सीरियाच्या हवाईतळावर शुक्रवारी जोरदार क्षेपणास्त्र हल्ला केला. दमास्कस येथून आलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यांत चार मुलांसह ९ नागरिक ठार झाले आहेत. सीरियाचे अध्यक्ष बशर असाद यांच्या राजकीय विरोधकांच्या ताब्यात असलेल्या शहरावर असाद सरकारने रासायनिक अस्त्रांनी केलेल्या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून अमेरिकेने हा हल्ला केला. निष्पाप लोकांचे जीव वाचवण्यासाठी सगळ््या सुसंस्कृत देशांनी आमच्यासोबत यावे, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून शायरात हवाईतळावर अमेरिकेच्या युद्धनौकेवरून ५०-६० टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. शायरात हवाईतळावरून रासायनिक अस्त्रांनी हल्ला केला गेला होता, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेने असाद यांच्याविरोधात लष्करी कारवाई करावी का, या प्रश्नावर ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात अशा प्रकारच्या हल्ल्यांना माझा विरोध असेल, असे म्हटले होते. ताज्या हल्ल्यानंतर मात्र, ट्रम्प यांच्या भूमिकेत विरुद्ध बदल झाल्याचे दिसते. पहाटे पावणेचार वाजता अमेरिकेच्या युद्धविमानांनी शायरात हवाईतळाची धावपट्टी, हँगर्स, नियंत्रण मनोरा आणि दारूगोळा विभागांना लक्ष्य केले होते. मॉस्कोहून आलेल्या वृत्तानुसार शायरात हवाईतळावरील नऊ विमाने व इंधनाचे डेपो नष्ट झाले. सीरियाच्या शायरात हवाईतळावर अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला सौदी अरेबियाने शुक्रवारी पूर्ण पाठिंबा दिला. ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली. (वृत्तसंस्था)सीरियाला रशियाचा पाठिंबामॉस्को : सीरियात हवाईतळावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्याचा काही परिणाम झालेला नाही, असे सांगून रशियाने सीरियातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी तेथील हवाई संरक्षण बळकट केले जाईल, असे स्पष्ट केले. याचाच अर्थ, आम्ही यापुढेही सीरियाला मदत करीत राहू, असे रशियाने स्पष्ट केले आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेनकोव्ह यांनी निवेदनात ही माहिती दिली.
सीरियावर अमेरिकेने डागली पन्नासपेक्षा अधिक क्षेपणास्त्रे
By admin | Published: April 08, 2017 12:14 AM