जगाला चीनपासून धोका की अमेरिकेपासून, यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे. कोरोनावरून अवघे जग चीनला कोसत असताना अमेरिकेने एक धोकादायक घटना जगापासून चार महिने लपवून ठेवली होती. दुसऱ्यांना पर्यावरण वाचविण्याचे धडे देणाऱ्या अमेरिकेने अणुउर्जा प्रकल्पातून १५ लाख लीटर रेडिओअॅक्टिव्ह पाणी वाहून गेले तरी जगाला कळविले नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
अमेरिकेच्या मध्य-पश्चिम मिनेसोटा राज्यातील मॉन्टीसेलो येथील अणुऊर्जा प्रकल्पातून सुमारे 4 लाख गॅलन (15,14,164 लीटर) किरणोत्सर्गी पाण्याची गळती झाली आहे. हे पाणी ट्रिटियमने दूषित झालेले आहे. याबाबतचे वृत्त Xinhua वृत्तसंस्थेने दिलेले आहे.
नियमित भूजल निरीक्षणादरम्यान पाण्यामध्ये रेडिओएक्टिव्ह पदार्थ सापडले होते. नोव्हेंबर 2022 अखेरीस हा प्रकार समोर आला होता. मिनेसोटा ड्युटी ऑफिसर आणि यूएस न्यूक्लियर रेग्युलेटरी कमिशनला याबाबत कळविण्यात आले होते. किरणोत्सर्गी पाण्याची गळती सार्वजनिक करण्यात चार महिन्यांच्या विलंबामुळे सार्वजनिक सुरक्षा आणि पारदर्शकतेबद्दल शंका निर्माण झाली आहे.
दूषित पाणी मिसिसिपी नदी किंवा पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांपर्यंत पोहोचले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच गळती दुरुस्त करण्यात आल्याचेही प्रकल्प प्रमुखांनी म्हटले आहे. मॉन्टीसेलो प्लांटमधील दोन इमारतींमधील पाण्याच्या पाईपमधून गळती झाली होती, असे एक्सेल एनर्जीने म्हटले आहे.