वॉशिंग्टन : उत्तर कोरियाकडून अणुहल्ल्याचा धोका तसेच प्रशांत महासागरात चीनचा वाढत असलेल्या हस्तक्षेपाची चिंता यामुळे अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया एकत्र आले आहेत. तिन्ही देश नवीन सुरक्षा ठरावावर स्वाक्षरी करण्यासाठी सज्ज आहेत. या ठरावात पॅसिफिक महासागर क्षेत्रातील सुरक्षा संकट किंवा धोक्याच्या पार्श्वभूमीवर तिन्ही देशांनी एकमेकांशी सल्लामसलत करण्याचे वचन दिले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
बायडेन हे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची मेरिलँडमधील कॅम्प डेव्हिड येथे एका शिखर परिषदेसाठी होस्ट करणार आहेत.
यात नवीन करारावर बोलणी केली जाणार आहेत. हे पाऊल शिखर परिषदेत जाहीर केलेल्या अनेक संयुक्त प्रयत्नांपैकी एक आहे. तिन्ही देश त्यांचे सुरक्षा आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
युद्धाभ्यासावर चीनची उपग्रहाद्वारे पाळत
चीनच्या मुसंडीला आव्हान देण्यासाठी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांनी पॅसिफिक महासागरात मलबार नौदल युद्धाभ्यास सुरू केला आहे. या युद्धाभ्यासावर शेकडो चीनी उपग्रह पाळत ठेवून आहेत. ते युद्धाभ्यासाची माहिती गोळा करत आहेत. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
किशिदा यांनी गुरुवारी टोकियो सोडण्यापूर्वी सांगितले की, ही शिखर परिषद अमेरिका आणि दक्षिण कोरियासोबत “त्रिपक्षीय धोरणात्मक सहकार्य वाढवण्याची ऐतिहासिक संधी” असेल.
कोणत्याही देशावर हल्ला हा सर्वांवर हल्ला
- बायडेन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “सल्ला देण्याचे कर्तव्य”च्या ठरावावरून असे दिसून येते की, तीन देश एकमेकांना सुरक्षेची खात्री देतात आणि कोणत्याही देशावर हल्ला हा सर्वांवर हल्ला असेल, असे मानले जाईल.
- अधिकाऱ्याने सांगितले की, या ठरावांतर्गत तीन देशांनी धोका किंवा संकटाच्या प्रसंगी एकमेकांशी सल्लामसलत करणे, माहितीची देवाणघेवाण करण्याचे मान्य केले आहे. दोन्ही देशांदरम्यान अमेरिकेचे ८०,००० हून अधिक सैनिक तैनात आहेत.
चीन म्हणतो...
- चीनने या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांमधील शिखर परिषदेवर पुन्हा एकदा टीका केली आहे. - कोणत्याही देशाने “इतरांच्या सुरक्षेचे हित, प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेच्या किमतीवर स्वतःच्या सुरक्षेचा प्रयत्न करू नये. - तणाव कोण वाढवते, हे आंतरराष्ट्रीय समुदायांना लक्षात आले आहे. यामुळे विविध देशांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची भीती असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग यांनी म्हटले आहे.