वॉशिंग्टन : अमेरिकेेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन २४ मे रोजी होणाऱ्या क्वाड परिषदेसाठी जपानला जाणार असून, ते तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहेत. ही माहिती अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी दिली.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत क्वाडिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग (क्वाड) या संघटनेची स्थापना झाली. अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया हे देश या संघटनेचे सदस्य आहेत. क्वाडच्या आतापर्यंत तीन परिषदा झाल्या असून, त्यातील दोन परिषदा कोरोना साथीच्या काळामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडल्या होत्या. जेक सुलिव्हन यांनी सांगितले की, हिंद-प्रशांत महासागराच्या प्रदेशात जलमार्गाने मुक्त व निर्भय वातावरणात प्रवास करता येईल तसेच व्यापारी घडामोडी सुरू राहातील यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यादृष्टीनेच जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या क्वाड परिषदेमध्ये या चारही देशांचे नेते चर्चा करणार आहेत. हिंद महासागराच्या काही भागात चीन आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.