America Joe Biden On Israel Hamas War: गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि हमास संघर्षाने तीव्र स्वरुप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे. हमास आणि इस्रायल या दोघांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये ६,५०० पेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, १,४०० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच २२४ जण हमासने ओलीस ठेवले आहेत. यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात जे युद्ध सुरू झाले, त्याला भारतात झालेली एक घोषणा कारणीभूत आहे, असा अजब तर्क दिला आहे.
जी-२० परिषदेत घोषणा करण्यात आलेल्या भारत, मध्य पूर्वेतील देश, युरोप यांच्यामध्ये इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळेच हमासने इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला असावा, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचे मी विश्लेषण केले. इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या घोषणेमुळे हमास संघटना अस्वस्थ झाली असावी. माझ्या म्हणण्याला कोणताही सबळ पुरावा नाही. इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे इस्रायलबरोबरच अन्य देशांचीही प्रगती होणार आहे. नेमके हेच हमासला नको असावे, असे बायडेन म्हणाले.
इस्रायलच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता
मागच्या काही आठवड्यात मी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला, इजिप्तचे राष्ट्रपती सिसी, पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती अब्बास आणि सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्ससोबत कॉरिडोरबद्दल चर्चा केली. इस्रायलच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. भविष्याच्या या योजनेत पॅलेस्टाइनच्या लोकांच्या इच्छा, आकांक्षा लक्षात घेतल्या जातील, असे जो बायडन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीत आयोजित जी-२० परिषदेत नव्या आर्थिक कॉरिडोरची घोषणा झाली. या कॉरिडोरची घोषणा भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, यूएई, फ्रान्स, जर्मनी यांनी संयुक्तपणे केली. चीनच्या बेल्ट अँड रोडला पर्याय म्हणून या घोषणेकडे पाहिल जात होते. या कॉरिडोरच्या माध्यमातून खाडी देशांसोबत जोडले जाणार आहोत. युरोपही जोडले जाईल.