नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन(Joe Biden) यांची अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भेट घेतली होती. त्याशिवाय पीएम मोदींनी वाइस प्रेसीडेंट कमला हॅरिससोबत चर्चा केली. भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या काळात अमेरिकेच्या नजरेतून पाकिस्तान बाजूला होताना दिसत आहे. पुन्हा एकदा हे प्रखरतेने समोर आलं.
एक वरिष्ठ व्हाइट हाऊस अधिकारी यांनी सांगितले की, प्रेसींडेंट बायडन पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांना कधी कॉल करतील सांगता येत नाही. अलीकडेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकन मीडियाशी संवाद साधताना राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन खूप बिझी आहेत. अद्याप त्यांनी पाकिस्तानशी संवाद साधला नाही अशी तक्रार केली होती. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर पाकिस्तानला अमेरिकेशी संवाद साधायचा होता. यावर व्हाइट हाऊसचे अधिकारी जेन साकी म्हणाले की, सध्या मी कुठल्याही प्रकारची भविष्यवाणी करू शकत नाही. जर राष्ट्राध्यक्षांनी कॉल केला तर जाहीरपणे ते तुम्हाला सांगितलं जाईल.
या पत्रकार परिषदेवेळी याकडेही लक्ष वेधले गेले की एकीकडे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन पंतप्रधान मोदींसोबत बैठक करत आहेत. तर इमरान खान(Pakistan PM Imran Khan) संयुक्त राष्ट्राच्या मंचावरून अफगाणिस्तानात अमेरिकेच्या कारवाईचा निषेध करत आहे. तेव्हा अधिकारी म्हणाले की, बायडन यांचं इम्रान खान यांच्याशी खूप कमी बोलणं होतं. अमेरिका पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री तसेच संरक्षण विभागाच्या टॉप अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. हे सत्य आहे की, बायडन प्रत्येक नेत्याशी बोलू शकत नाहीत. परंतु बायडन यांच्याकडे तज्ज्ञांची टीम आहे ती पुढचं कार्य करते असं जेन म्हणाले.
ज्यो बायडन यांच्या कॉलची वाट पाहत नाही – इम्रान खान
ज्यो बायडन यावर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. पाकिस्तानचे पंतप्रधान १५ सप्टेंबरला म्हणाले की, बायडन हे खूप बिझी व्यक्ती आहेत. तुम्ही लोकांनी विचारायला हवं अखेर पाकिस्तानशी बोलायला तुम्ही वेळ का काढत नाही असं माध्यमांना इमरान खान यांनी सांगितले. परंतु असंही नाही मी त्यांच्या कॉलची वाट पाहत आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या नियंत्रणानंतरही बायडन यांनी पाकिस्तानशी संवाद साधला नाही असं इम्रान खान म्हणाले.
भारताला धोरणात्मक भागीदार समजतो अमेरिका - पाकिस्तान
विशेष म्हणजे इम्रान खान यांनी ज्यो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर त्यांना शुभेच्छा देत अमेरिकेसोबत चांगले संबंध ठेवत बायडन यांच्या नवीन प्रशासनासोबत एकत्र काम करण्याची इच्छा जाहीर केली होती. अमेरिका पाकिस्तानला अफगाणिस्तानात चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर देश समजते. परंतु जेव्हा धोरणात्मक भागीदारी होते तेव्हा अमेरिका भारताला प्राधान्य देते असंही पाकिस्ताननं म्हटलं आहे.