वॉशिंग्टन:पत्रकारांच्या टोकदार प्रश्नांनी राजकीय नेते अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे, मात्र महागाईशी संबंधित एका प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन इतके संतापले की त्यांनी पत्रकाराला भर पत्रकार परिषदेत शिवी दिली. बिडेन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते फॉक्स न्यूजच्या पत्रकाराला अपमानास्पद भाषेत बोलताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका सुरू झाली आहे.
या प्रश्नामुळे भडकले
मीडिया रिपोर्टनुसार, बिडेन अर्थव्यवस्थेवर त्यांच्या सल्लागारांशी बोलत होते. यावेळी पत्रकार पीटर डूसी यांनी जो बिडेन यांना महागाईवर प्रश्न विचारला. पत्रकाराने विचारले की, महागाईशी संबंधित प्रश्नांची उत्तरे द्याल का? मध्यावधी निवडणुकांनंतर महागाई ही राजकीय जबाबदारी असेल असे वाटते का? या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर, बिडेन यांनी पत्रकाराला माईकवरच मूर्ख आणि B***h हा अपशब्द वापरला. यानंतर आता जो बिडेन यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
अमेरिकेत महागाई विक्रमी पातळीवरअमेरिकेत डिसेंबरमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महागाईने गेल्या चार दशकांतील उच्चांक गाठल्याचे मानले जात आहे. फॉक्स न्यूजने बिडेन यांच्यावर अनेकदा टीका केली आहे, त्यामुळेच त्यांच्या पत्रकाराने महागाईबद्दल प्रश्न विचारला असता, बिडेन यांनी पत्रकाराला अपशब्द वापरला.
माजी अध्यक्षही भडकायचे
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीटर डूसीचे वक्तव्यही आले आहे. ते म्हणाले की, या घटनेच्या काही तासांनंतर बिडेन यांचा कॉल आला होता. त्यात त्यांनी विधानाला वैयक्तिकरित्या घेऊ नका, असे म्हटले. विशेष म्हणजे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील पत्रकारांशी चुकीच्या पद्धतीने बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक प्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना चुकीच्या शब्दात उत्तरे दिली आहेत.