वॉशिंग्टन : अमेरिकेचे नव-निर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या उजव्या पायाला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना चालण्यासाठी आता काही आठवडे ‘वॉकिंग बूट’चा वापर करावा लागेल, असे त्यांच्या डॉक्टरांनी म्हटले आहे. बायडन शनिवारी आपला पाळीव कुत्रा मेजर यांच्या सोबत खेळताना पाय घसरून पडले, त्यांच्या उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे.
बायडन यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर केविन ओ कोन्नोर यांनी रविवारी सांगितले, की ‘‘सुरुवातीच्या एक्स-रेमध्ये कुठल्याही प्रकारच्या फ्रॅक्चरची माहिती मिळाली नाही. मात्र, वैद्यकीय तपासण्यांवरून, यावर आणखी लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे वाटते.’’
जीडब्ल्यू मेडिकल फॅकल्टी असोसिएट्समधील संचालक कोन्नोर यांनी बायडन यांची तपासणी केली. यानंतर आलेल्या अहवालावरून त्यांनी सांगितले, की ‘‘नंतरच्या सीटी स्कॅनमध्ये नव-निर्वाचित राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या पायात छोटेसे फ्रॅक्चर असल्याचे समजते. पुढील काही आठवडे त्यांना चालताना वॉकिंग बुटांची आवश्यकता भासेल.’’
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत लवकर बरे होण्याची केली प्रार्थना -बायडन पुढील वर्षी 20 जानेवारीला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतील. ते सध्या 78 वर्षांचे आहेत. विशेष म्हणजे ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान होणारे सर्वात वयस्क व्यक्ती असतील. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सायंकाळी एक ट्विट करत, बायडन यांच्यासाठी लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. बायडन यांनी याच महिन्यात ट्रम्प यांचा पराभव करत अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.