ऑनलाइन लोकमत
शिकागो (अमेरिका), दि. 2 - पती व तीन मुलांसह वॉशिंग्टनला सुटीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या मुस्लीम महिलेने मुस्लीम पेहराव असल्यामुळे युनायटेड एअरलाइन्सने विमानातून उतरवल्याचा आरोप केला आहे. फेसबुकवर इमान अमी साद शेबली या महिलेने दोन व्हिडीयो पोस्ट केले असून एअरलाइन्सचे अधिकारी सुरक्षेचे कारण देत या कुटुंबाला उतरवत असल्याचे दिसत आहे.
आम्ही कसे दिसतो याखेरीज विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे दुसरे कोणतेही कारण नव्हते असा दावा शेबलीने केला आहे. तर आमच्याकडे भेदभावाला अजिबात थारा नसल्याचे सांगत केवळ सुरक्षेच्या कारणावरून या कुटुंबाला उतरवल्याचा दावा एअरलाइन्सने केला आहे.
मुलांची जी सेफ्टी सीट या कुटुंबासोबत होती ती सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बसत नसल्याचे कारण विमानाच्या कप्तानाने दिले आहे. हे कारण शेबलीला मान्य नसल्याचे दिसत आहे. शेबलीने दुसऱ्या एका मुस्लीम महिलेचा अनुभव दिला आहे. या महिलेला सोडा उघडण्यास मनाई करण्यात आली होती. या बाटलीचा वापर शस्त्रासारखा केला जाऊ शकतो असे कारण देण्यात आले होते.
हा प्रकार घडल्यानंतर शेबलीने काउन्सिल ऑफ अमेरिकन इस्लामिक रिलेशन्सकडे तक्रार केली आहे. हिजाब घालणाऱ्यांना अशी वागणूक मिळते असा आरोप या संस्थेने केला आहे. मुस्लीमांसारखा पेहराव करणाऱ्यांना न पटणारी कारणं देत विमानातून उतरवण्याचे असंख्य प्रकार घडत असून आम्ही या त्रासाला कंटाळलो आहोत अशी भावना या संस्थेचे कार्यकारी संचालक अहमद रेहाब यांनी व्यक्त केली आहे.
Posted by Eaman-Amy Saad Shebley on Wednesday, March 30, 2016