अमेरिकेतील एका व्यक्तीला एकाच वेळी खरेदी केलेल्या दोन लॉटरीच्या तिकिटांनी रातोरात कोट्यधीश बनवले. खरे तर या व्यक्तीने चुकून एकाच लॉटरीचे दोन तिकिटे खरेदी केली होती. पण ती व्यक्ती एवढी नशीबवान निघाली, की त्याला दोन्हीही तिकिटे लागली.
सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यात राहणार्या स्कॉटी थॉमसने दोन लॉटरीतून सुमारे 5.5 कोटी रुपये जिंकले आहेत. थॉमसने सांगितले की, एक दिवस तो घरीच होता, यामुळे त्याने टाइमपास म्हणून 'लॉटरी फॉर लाइफ'चे तिकीट खरेदी करण्याचे ठरवले. यानंतर त्याने लॉटरीच्या तिकिटांसाठी ऑनलाइन माहिती भरायला सुरुवात केली.
थॉमसने सांगितले, "खरे तर, दोन वेळा माहिती भरून मी एक ऐवजी दोन तिकिटे केव्हा विकत घेतली ते मलाच समजले नाही. मला वाटले की मी लॉटरीचे एकच तिकीट खरेदी केले आहे. पण दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाने मला सांगितले की एकाच लॉटरीच्या दोन वेगवेगळ्या किंमती दिसत आहेत. तेव्हा मला समजले, की माझ्याकडून चुकून एकाच लॉटरीची 2 तिकिटे घेतली गेली आहेत. त्यावेळी मी थोडा निराशही झालो होतो.
'बातमी ऐकताच फरशीवर झोपला' -काही दिवसांनंतर थॉमसला समजले, की त्यांच्या दोन्हीही लॉटऱ्या लागल्या आहेत. त्यावेळी त्याचा अजिबात विश्वास बसत नव्हता. थॉमस म्हणाला, ही बातमी ऐकताच मी थोडा वेळ फरशीवर पडून राहिलो. कारण मझ्यासाठी ते चमत्कारापेक्षा कमी नव्हते. आता मी खूप आनंदी आहे, की या चुकीमुळे मला नुकसान नाही, तर थोडा अधिक फायदा झाला.