वॉशिंग्टन: रशियाचे युक्रेनवरील हल्ले (Russia Ukraine War) सुरूच आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा १९ वा दिवस आहे. युक्रेनच्या विविध भागांवर केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. युक्रेनमधील लाखो रहिवासी देश सोडून इतरत्र स्थलांतरित होत आहेत. अद्यापही रशिया युद्ध थांबवायला तयार नाही. युक्रेनही जोरदार प्रत्युत्तर देत असून, माघार घेण्यास कोणताही देश तयार नाही. यातच चीनसह अन्य काही देश रशियाला मदत करत असून, या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनला थेट इशारा दिला आहे. रशियाला मदत केल्यास चीनवर कठोर कारवाईचे संकेत अमेरिकेने दिले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांनी यावर भाष्य केले असून, रशिया युक्रेनवर हल्ला करणार आहे हे चीनला आधीच माहीत होते. त्यांची चीनवर बारीक नजर आहे, असा सूचक इशारा देण्यात आला आहे. चीन रशियाला कुठलेही सहकार्य, वस्तूंचा पुरवठा, आर्थिक सहकार्य किती प्रमाणात पुरवतो, यावर अमेरिकेची बारकी नजर आहे. चीनने रशियाची नुकसानभरपाई करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका शांत बसणार नाही, असा इशारा चीनला देण्यात आला आहे. अमेरिकेने दिलेल्या या इशाऱ्यावर चीनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यासंदर्भात अमेरिका आणि चीनच्या अधिकाऱ्यांची एक बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकेचे युक्रेनला अतिरिक्त अर्थ सहाय्य
अमेरिकेने युक्रेनला सुमारे १५ अब्ज ३५ कोटी रुपयांचे अतिरिक्त सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालय यासाठी अधिकृत मंजुरीसाठी अंमित प्रक्रिया पूर्ण करत आहे. अतिरिक्त मदतीशिवाय, शस्त्रास्त्रे, सैन्य सेवा, शिक्षण आणि प्रशिक्षणही युक्रेनला देण्यात येणार आहे. यापूर्वीही अमेरिकेने कोट्यवधी डॉलरची मदत जाहीर केली होती. तत्पूर्वी जागतिक बँकेनेही कोट्यवधींचे कर्ज युक्रेनला मंजूर केले आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील वाद आता आणखी चिघळला आहे. रशियाकडून युक्रेनवर वारंवार हल्ले केले जात आहेत. याच दरम्यान युक्रेनच्या मिलिट्री ट्रेनिंग ग्राऊंडवर रशियाने 'एअर स्ट्राईक' केला आहे. रिपोर्टनुसार, रशियाने युक्रेनच्या लवीव या युक्रेन-पोलंड सीमेजवळील लष्करी तळावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. यातील अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.