अमेरिका सहकारी देशांच्या साथीने हल्ला करण्याच्या तयारीत; रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 04:55 PM2024-03-05T16:55:12+5:302024-03-05T16:58:19+5:30
हा दावा समोर आल्यानंतर जगभरात तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Russia vs America World War: युक्रेन-रशिया युद्धादरम्यान रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मोठा दावा केला आहे. अमेरिका आणि पाश्चात्य देश मिळून रशियावर हल्ला करू शकतात, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांसोबत लष्करी हातमिळवणी करू शकते. हा दावा समोर आल्यानंतर जगभरात तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. अलीकडेच फ्रान्समध्ये झालेल्या युक्रेन युद्धासंदर्भात पाश्चात्य देशांच्या बैठकीत रशियाविरुद्ध लष्करी कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, ज्यामध्ये पाश्चात्य देशांनी रशियाविरुद्ध युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवण्याबाबत चर्चा केल्याचे बोलले जात आहे.
रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि त्याचे सहकारी एक संयुक्त ऑपरेशनल फोर्स तयार करू शकतात आणि लढाऊ विमाने व क्षेपणास्त्रांसह रशियन लष्करी तळांवर बॉम्बहल्ले करू शकतात. असे झाल्यास त्याचा परिणाम जगभरात दिसून येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. हमास-इस्त्रायल युद्ध आणि लाल समुद्रातील हुथी हल्ल्यांमुळे जगभरातील उत्पादनांचा पुरवठा प्रभावित झाल्याने अनेक उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत मंदीची लाट सोसत असलेल्या जगाला युद्ध पेलवणारे नाही.
रशिया हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. तेल उत्पादक देशांची संघटना OPEC+ मध्ये रशियाची महत्त्वाची भूमिका आहे. युक्रेन-रशिया युद्धानंतर लागू करण्यात आलेल्या निर्बंधानंतर भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेलाची आयात केली. रशिया-युक्रेन युद्धाने भयंकर वळण घेतल्यास त्याचा परिणाम जगभर दिसून येईल, विशेषतः भारतातही तेलाच्या किमती गगनाला भिडतील.
अलीकडेच, युक्रेनच्या गुप्तचर संस्थेने (GUR) दावा केला आहे की, त्यांनी रशियन संरक्षण मंत्रालयावर सायबर हल्ले केले आहेत. एजन्सीने म्हटले आहे की सायबर तज्ज्ञांना अनेक रशियन दस्तऐवजांमध्ये प्रवेश मिळाला आहे, ज्यात ऑर्डर अहवाल आणि रशियन सैन्याच्या सूचना अहवालांचा समावेश आहे. गुप्तचर संस्थेने दावा केला होता की, मिळलेल्या माहितीच्या मदतीने आम्ही रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रणाली आणि त्याच्या युनिट्सची संपूर्ण रचना जाणून घेऊ शकतो.