अमेरिकेतील मॅरीलँडमध्ये रविवारी रात्री एक छोटे विमान विजेच्या खांबात शिरले. यामुळे हजारो घरांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ही घटना मॉन्टगोमेरी काउंटीमध्ये घडली आहे. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहाणी झाल्याचे वृत्त नाही. दोन लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. वॉशिंग्टन पोस्टने स्थानीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
या प्लेन क्रॅशमुळे संपूर्ण मॉन्टगोमेरी काउंटीमधील तब्बल 90 हजार घरे आणि दुकानांतील वीज गूल झाली आहे. याचाच अर्थ काउंटीतील एकूण एकचतुर्थांश लोक वीज संकटाचा सामना करत आहेत. यासंदर्भात मॉन्टगोमेरी काउंटीच्या पोलिसांनी ट्विट करत म्हटले आहे, 'रोथबरी डॉ अण्ड गोशेन आरडी परिसरात एक छोटे विमान विजेच्या खांबाला धडकले यामुळे काउंटीतील वीज गुल झाली आहे. @Mcfrs घटनास्थळी आहे. या परिसरापासून दूर राहा, कारण येथे मोठ्या प्रमाणावर विजेच्या तारा आहेत. यांत वीज पुरवठा सुरू आहे.'
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, सिंगल इंजिन असलेले, मूने M20J विमान रविवारी सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी (स्थानिक वेळेनुसार) विजेच्या खांबाला धडकले आणि त्यातच अडकले. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहेत. यात विमान विजेच्या खांबावर साधारणपणे 100 फूट उंचावर अडकलेले दिसत आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे वातावरण होते. हे विमान कमर्शिअल एरिया जवळ क्रॅश झाले. मात्र, अद्याप हा अपघात कशामुळे झाला हे समजू शकले नाही.