इस्लामाबाद : अफगाणिस्तानातून होणारे हल्ले रोखण्यासह सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी अमेरिकापाकिस्तानला निधी देण्यास तयार आहे, असे पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी म्हटले आहे. भुट्टो यांनी १४ ते २१ डिसेंबरदरम्यान अमेरिकेचा दौरा केला. यावेळी त्यांनी अमेरिकेकडून २०२३मध्ये देण्यात येणाऱ्या सीमा सुरक्षा निधीबाबत वरिष्ठ अमेरिकन खासदारांशी चर्चा केली होती.
सन २०२३च्या अर्थसंकल्पात सीमा सुरक्षेसाठी तुम्हांला मदत करू, असा शब्द न्यू जर्सीचे बॉब मेनेंडेझ व दक्षिण कॅरोलिनाचे लिंडसे ग्रॅहम या दोन ज्येष्ठ अमेरिकन खासदारांनी मला दिला आहे, असे भुत्तो यांनी पत्रकारांना सांगितले.
अफगाणिस्तानात तळ असलेल्या तहरीक - ए - तालिबान पाकिस्तानसारख्या संघटनांनी अलीकडे पाकिस्तानी लक्ष्यांवर हल्ले वाढवले असल्याचा उल्लेख अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने वाॅशिंग्टनमधील एका पत्रकार परिषदेत केला होता. तसेच या सततच्या वाढत्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेकडून पाकला मदत देण्याचा प्रस्ताव असल्याचेही म्हटले होते. भुट्टो यांनी या दौऱ्यात जी-७७ आणि चीन यांच्यातील मंत्रिस्तरीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"