US Airstrike Baghdad: इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचा पाठिंबा असलेल्या मिलिशियाचा एक वरिष्ठ कमांडर ठार झाला. मिलिशियाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मिलिशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी मध्य बगदादमधील त्यांच्या मुख्यालयावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात एक उच्चपदस्थ कमांडर ठार झाला. हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा इस्रायल-हमास युद्धामुळे या भागात आधीच तणाव वाढला आहे. तशातच आता हा संघर्ष आसपासच्या देशांमध्ये पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस (PMF) ने एका निवेदनात म्हटले आहे, की बगदादमधील हल्ल्यात ठार झालेल्या त्यांच्या कमांडरचे नाव हरकत अल-नुजाबाचे उपप्रमुख मुश्ताक जवाद काझिम अल-जवारी अबू ताक्वा होते. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. इराण-समर्थित शिया मिलिशियाचा कमांडर गुरुवारी बगदादमध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मारला गेला. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वॉशिंग्टनने या प्रदेशातील अमेरिकन सैन्यावरील हल्ल्यासाठी त्या व्यक्तीला जबाबदार धरले होते, त्यांच्यावर एअरस्ट्राईक करण्यात आला आहे.
मुश्ताक जवाद काझिम अल-जवारी हा त्याच्या गटाच्या बगदाद मुख्यालयातील गॅरेजमध्ये प्रवेश करणार असताना त्याच्या कारमध्ये ठार झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हरकत अल-नुजाबा सीरिया आणि इराकमध्ये सक्रिय आहे आणि तेहरानशी एकनिष्ठ आहे. हे इराकच्या पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस (पीएमएफ) चा देखील भाग आहे. पेंटागॉनने म्हटले आहे की जावरी अमेरिकन सैन्यावर हल्ले करण्याचे नियोजन करण्यात आणि घडवून आणण्यात सहभागी होता. नुजाबा गटाने दक्षिणेकडील किनारी शहर इलात येथे इस्त्रायली शाळेवर ड्रोन हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली आहे.