"आपले तर पुतीन यांच्याशी चांगले संबंध..."; अमेरिकेचं पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा मोठं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 11:29 AM2024-07-16T11:29:14+5:302024-07-16T11:30:18+5:30
यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर असतानाही अमेरिकेने अशा पद्धतीचे आवाहन केले होते. भारताने ठरवले तर ते पुतिन यांना युद्ध रोकण्यासाठी राजी करू शकतात, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या दोन वर्षांहूनही अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताने पुढाकार घ्यावा असे आवाहन अमेरिकेने केले आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या मधुर संबंदांचा हवाला दिला आहे. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर असतानाही अमेरिकेने अशा पद्धतीचे आवाहन केले होते. भारताने ठरवले तर ते पुतिन यांना युद्ध रोकण्यासाठी राजी करू शकतात, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता मॅथ्यू मिलर पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, "भारत आणि रशिया यांचे चांगले संबंध आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. अमेरिकेच्या वतीने बोलताना, आम्ही भारताला रशियासोबतच्या संबंधांचा योग्य दिशेने वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले. भारताकडे राष्ट्रपती पुतिन यांनी सुरू केलेले युद्ध थांबवणे आणि कायम शांतता प्रस्थापित होईल, असा तोडगा काढण्याची पूर्ण संधी आहे. पंतप्रधान मोदी राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना संयुक्त राष्ट्र चार्टर आणि युक्रेनची प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर करण्यास सांगू शकतात. एवढेच नाही, रशियासोबत डील करण्यासंदर्भात भारत हा अमेरिकेचा एक महत्वाचा साथिदार आहे, असेही मिलर यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, गेल्या आठवड्यात व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यानेही यासंदर्भात भाष्य केले होते. यासंदर्भात बोलताना व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव म्हटल्या होत्या, भारताने ठरवले तर, ते राष्ट्रपती पुतिन यांना युद्ध थांबवण्याची विनती करू शकतात. खरे तर, यूक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध पुतिनच संपवू शकता, कारण हे युद्ध त्यांनीच सुरू केले आहे, असे अमेरिकेने वारंवार म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय मॉस्को दौऱ्यानंतर काही दिवसांतच अमेरिकेनेचे हे वक्तव्य आले आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच रशिया दौरा होता.