अमेरिकेत एक मोठी दुर्घटना घडली आहे. उटाह येथे आलेल्या वाळूच्या वादळामुळे भीषण अपघात झाला आहे. उटाह महामार्गावर आलेल्या वाळूच्या वादळामुळे तब्बल 22 वाहनं एकमेकांवर धडकून भयंकर अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाले असून यामध्ये चार मुलांचा समावेश आहे. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालवाहू ट्रक आणि कारची भीषण धडक झाली. वीकेंड साजरा करून घरी परतणाऱ्या लोकांवर काळाने घाला घातला आहे.
अचानकपणे वाळूचे वादळ आल्याने वाहन चालकांना काहीच दिसले नाही. त्यामुळे वाहनांची धडक झाली आणि ही दुर्घटना घडली आहे. 'एपी' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रविवारची सुट्टी संपवून अनेकजण घरी परतत असल्यामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ अधिक होती. याच दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर जवळपास दहा लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी पाचजण एकाच कारमधील होते.
दुसऱ्या वाहनातील काही लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वर्षाच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांची धडक झाली आहे. जवळपास 22 वाहनं एकमेकांवर धडकली. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. सध्या अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या मदतीने हटवण्यात आले. काही वेळेसाठी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.