अमेरिकेतील मेरिलँडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. महत्वाच्या बाल्टिमोर ब्रिजला मोठ्या जहाजाची धडक बसल्याने ते कोसळले आहे. या घटनेवेळी पुलावर २० कामगार काम करत असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत अनेकजण बुडाल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक वेळेनुसार मंगळवारी पहाटे दीड वाजता हा अपघात घडला आहे. या अपघाताचे व्हिडीओ समोर आले आहेत. पाटाप्सको नदीवरील ही घटना आहे. या नदीवर दोन बाजुंना जोडणारा स्टीलचा ब्रिज बांधलेला होता. या खालून जहाजांची येजा होत होती. परंतु, आज एक जहाज पुलाच्या खांबावरच जाऊन धडकले आहे.
या पुलावर कामगारांसोबतच वाहनांची येजा देखील सुरु होती. यामुळे किती वाहने पाण्यात कोसळली आहेत, याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. कमीतकमी सात लोक पाण्यात फेकले गेल्याची माहिती शहराच्या अग्निशमन विभागाने दिली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.