Indians in America: अमेरिकेच्या राजकारणात 1 नोव्हेंबर अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. दोन भारतीय वंशाचे अमेरिकन राजकारणी आमनेसामने आले. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार विवेक रामास्वामी आणि डेमोक्रॅटिक खासदार रो खन्ना यांच्यात डिबेट झाली. दोघांमधील ही डिबेट मँचेस्टरच्या सेंट अँसेल्म कॉलेजच्या न्यू हॅम्पशायर इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्समध्ये पार पडली.
द हिल रिपोर्टनुसार, विवेक रामास्वामी आणि रो खन्ना यांनी परंपरावादी(कंझर्व्हेटिव्ह) आणि उदारमतवादी(लिबरल) यांच्यातील वैचारिक आणि राजकीय मतभेदांवर चर्चा केली. रामास्वामींसोबत चर्चेची कल्पना रो खन्ना यांनी सोशल मीडिया साइट X वर सुचवली होती. त्यावर उत्तर देताना रामास्वामी यांनी खन्ना यांना 'सॉलिड ड्यूड' म्हटले होते.
रामास्वामी आणि खन्ना, यांची अनेक मुद्द्यांवर वेगवेगळी मते आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, दोन्ही भारतीयांमध्ये मोठा वैचारिक फरक आहे. मात्र, गेल्या महिन्यातच रो खन्ना यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये सुधारणांचा प्रस्ताव मांडला होता, त्याला रामास्वामी यांनी पाठिंबा दिला होता. या वर्षी जुलैमध्ये एका टीव्ही अँकरने ते हिंदू असल्यामुळे मते देऊ नका असे आवाहन केले होते, तेव्हा खन्ना उघडपणे रामास्वामी यांच्या पाठीशी उभे राहिले होते.
कोण आहेत रो खन्ना आणि विवेक रामास्वामी?रो खन्ना हे चार वेळा कॅलिफोर्नियाचे खासदार राहिले आहेत. त्यांचे आई-वडील 1970 च्या दशकात अमेरिकेत गेले. त्यांच्या आजोबांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता आणि अनेकवेळा तुरुंगातही गेले. रो खन्ना यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. तर, विवेक रामास्वामी हे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. 38 वर्षीय रामास्वामी यांचा जन्म ओहायोमध्ये झाला. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. पुढे येल विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.