नवी दिल्ली-
अमेरिका आणि चीन यांच्यात तणाव असतानाच चीननं तैवानवर सायबर हल्ला चढवला आहे. तैवान सरकारची अधिकृत वेबसाइट डाऊन झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चीननं तैवान सरकारची वेबसाइट हॅक केली आहे. तैवान सरकारच्या वेबसाइटवर गेल्यास सध्या 502 Server Error असा मेसेज येत आहे. इतकंच नव्हे, तर तैवान सरकारच्या राष्ट्रपती कार्यालयाच्या वेबसाइटवरही सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामागे चीनचाच हात असल्याचं सांगितलं जात आहे.
अमेरिकेशी जवळीक वाढवत असल्यानं चीनंनं तैवानबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या हाऊस स्पीकर नेन्सी पेलोसी यांनी तैवानच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं जाहीर केल्यानंतर चीनचा थयथयाट झाला आहे. आज नेन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल होणार आहेत. त्याआधीच चीननं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. अमेरिकेनं तैवान प्रकरणात हस्तक्षेप करु नये अशी चीनची भूमिका आहे. तसंच अमेरिकेचा कोणताही प्रतिनिधी तैवानमध्ये येऊ नये असं चीनचं म्हणणं आहे. पण चीनच्या इशाऱ्याला केरची टोपली दाखवत तैवाननंही अमेरिकेसोबत जवळीक केली आहे. तसंच अमेरिकेनंही आक्रमक भूमिका घेत नेन्सी यांच्या दौऱ्यानं थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
अमेरिकेनं जर तैवानमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम भोगावे लागतील असा उघड इशारा चीननं दिला आहे. नेन्सी यांच्या दौऱ्यामुळे शांती भंग होईन आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण होईल असाही इशारा चीननं दिला आहे. चीनच्या इशाऱ्याला झुगारून नेन्सी यांचा दौरा आज होत आहे. त्यामुळे येत्या काळात चीन आणि तैवान यांच्यात युद्ध परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.