वॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानी लष्कराच्या छत्रछायेत लपलेल्या कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला खरा, मात्र आता त्याचा मुलगा अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरला आहे. यामुळे लादेनच्या मुलाला शोधणाऱ्याला तब्बल 1 दशलक्ष डॉलरचा इनाम जाहीर केला आहे.
अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला 2 मे 2011 मध्ये पाकिस्तानातील अबोटाबादमधील लष्करी तळा शेजारील एका घरामध्ये अमेरिकेने गोळ्या घातल्या होत्या. यानंतर ओसामाची संघटना त्याचा मुलगा हाजमा याने ताब्यात घेतली. आता हा ओसामाचा मुलगा अल कायदासह अन्य जिहादी संघटनांचा नेता बनला असून दहशतवाद्याचे जाळे उभारण्यास सुरुवात केली आहे.
यामुळे अमेरिकेने गुरुवारी हाजमाच्या डोक्यावर 1 दशलक्ष डॉलरचा इनाम घोषित केला आहे. हाजमाला अफगाणिस्तान, पाकिस्तानमध्ये जिहादींचा राजा संबोधले जात आहे. यामुळे पुन्हा काही अघटीत घडण्याआधीच अमेरिकेला हाजमा हवा आहे. महत्वाचे म्हणजे अमेरिकेने ओसामावर 25 दशलक्ष डॉलरचे बक्षिस ठेवले होते. ओसामावर 11 सप्टेंबरच्या अमेरिकेतील जुळ्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवरवरील विमान हल्ल्यामध्ये 2977 जणांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.