नवी दिल्ली : अमेरिकेमध्ये राहण्याचा कायदेशीर अधिकार संपला असेल किंवा बेकायदा अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी लोकांना अमेरिका सोमवारापासून त्यांच्या मुळ देशात पाठविणार आहे. व्हिसा मुदत संपली, मुदतवाढ मिळाली नाही किंवा नोकरी बदलली असल्यास अशा व्यक्तींना अमेरिका सोडावी लागणार आहे. सोमवारपासून ही प्रक्रिया सुरु होणार असली तरीही H-1B व्हिसाधारकांना काही प्रमाणात दिलासाही देण्यात आला आहे.
अमेरिकी नागरिकत्व आणि आव्रजन सेवा (USCIS) या संस्थेवर व्हिसाची मुदत वाढ आणि बेकायदा राहणाऱ्या नागरिकांना देशाबाहेर पाठविण्याची जबाबदारी आहे. 1 ऑक्टोबरपासून नवीन कायदा लागू करण्याच्या दृष्टीने हा निर्णय राबविण्यात आला आहे.
नवीन कायद्यानुसार USCIS विभाग अशा प्रकारे अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना नोटीस पाठविणार आहे. मात्र, ज्याच्या व्हिसाची मुदत संपली आहे, परंतू त्यांनी मुदत वाढीसाठी अर्ज केला असल्यास त्या व्यक्तीला निर्णय येईपर्यंत दिलासा देण्यात आला आहे.
व्हिसाची मुदत वाढविण्यास नकार किंवा नोकरी बदलली असल्यास त्यांना मायदेशी पाठवून देण्यात येणार आहे. यामध्ये भारतीयांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या कायद्यानंतर भारतीयांवर त्याचा मोठा परिणाम दिसून येणार असून त्यांना भारतात परतावे लागणार आहे.