वॉशिंग्टन : उत्तर कोरियाने गेल्या आठवड्यात केलेल्या अणुचाचणीनंतर तणाव निर्माण झाला असतानाच अमेरिकेच्या अण्वस्त्रवाहू बी-५२, एफ-१६ आणि दक्षिण कोरियाच्या एफ-१५ विमानांनी उत्तर कोरियाच्या सीमेनजीक अगदी कमी उंचीवरून घिरट्या मारल्या.या भागात जपान, दक्षिण कोरिया अन्य काही राष्ट्रे अमेरिकेची मित्र राष्ट्रे आहेत. त्यांना उत्तर कोरियापासून धोका असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्यांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होण्यासाठीच शक्तिप्रदर्शन म्हणून आपल्या विमानांनी ही कारवाई केली, असे अॅडमिरल हॅरी बी हॅरी (अमेरिकेची एशिया पॅसिफिक कमांड) यांनी सांगितले.ते म्हणाले की, उत्तर कोरियाची अणुचाचणी ही आंतरराष्ट्रीय जबाबदारीचे उघड उल्लंघन असून त्या दृष्टीने अमेरिका आणि मित्र राष्ट्रे एकत्रित प्रयत्न करीत आहेत. या भागात स्थैर्य आणि सुरक्षितता राहण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.उत्तर कोरियाच्या सीमेपासून १०० कि.मी. अंतरावरील ओसान हवाई तळावरून दोन्ही देशांच्या विमानांनी उड्डाणे केली होती. त्यात या भागातील जनतेत विश्वासाची भावना निर्माण करते आणि स्थैर्य राखून शक्तिप्रदर्शन करणे हाच हेतू होता. एशिया पॅसिफिक विभागात अमेरिकेने अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणारी बी-५२ ही विमाने फार पूर्वीपासूनच तैनात केली असून त्यांच्या जोडीला एफ-१६ ही लढाऊ विमानेही ठेवली आहेत. त्यांच्यासोबत दक्षिण कोरियाची एफ-१५ विमानेही आहेत. उड्डाण करून ही सर्व विमाने सुरक्षित गुआम विमानतळावर उतरली. या भागात अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांचे निकटचे लष्करी सहकार्य आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे अमेरिकेचे अन्य एक लष्करी अधिकारी जन. क्युरटिस एम. स्कॅप्रोनी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)आत्मसंरक्षणासाठी हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतल्याचा किम यांचा दावा सोल : हायड्रोजन बॉम्बची चाचणी आत्मसंरक्षणासाठी करण्यात आली असून अमेरिकेसोबत अणुयुद्ध रोखण्याचे ते एक पाऊल आहे. या शब्दांत उत्तर कोरियाचे नेते किम जाँग इन यांनी या चाचणीचे जोरदार समर्थन केले आहे.गेल्या आठवड्यात बुधवारी उत्तर कोरियाने कथितरीत्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. त्यावर तीव्र आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया उमटली होती. ती अणुचाचणी व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया यावर किम यांनी दिलेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.गेल्या बुधवारी करण्यात आलेली अणुचाचणी चौथी होती. या अणुचाचणीने आंतरराष्ट्रीय समुदाय संतप्त झाला, तर शेजारचा देश असलेल्या दक्षिण कोरियासोबत उत्तर कोरियाचा तणाव वाढला.
अमेरिकी विमानांची उत्तर कोरियाच्या सीमेवर भरारी
By admin | Published: January 11, 2016 2:54 AM