वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर जागतिक पातळीवर अनेक धाडसी निर्णय घेत आहेत. अमेरिकेत धोरणात्मक बदल करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यात सुरुवातीला अवैध स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांवरही ट्रम्प यांनी कारवाईचा बडगा उगारत आतापर्यंत ३ विमान भारतात पाठवली आहेत. आता भारतीय पदवीधरांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या कंपन्यांना निर्देश देत स्थानिक विद्यापीठातून गोल्ड कार्ड नागरिकत्वासह भारतीय पदवीधरांना नोकरीवर ठेवा अशा सूचना दिल्या आहेत. भारतीय पदवीधरांना याआधी अमेरिकन कंपन्यांमध्ये कामावर ठेवताना अनेक अडचणी समोर येत होत्या आणि पदवीधर विद्यार्थी अमेरिकेत शिकून भारतात परतायचे. भारतात येऊन ते कंपनी उघडतात, अब्जाधीश बनतात आणि तिथल्या हजारो लोकांना रोजगार देतात असं त्यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेत भारत, चीन, जपान आणि वेगवेगळ्या देशातून येतात. ते हार्वर्ड किंवा द व्हार्टन स्कूल ऑफ फायनान्समधून शिक्षण पूर्ण करतात. त्यांना नोकरी मिळते परंतु त्यांना अमेरिकेत राहता येतंय की नाही हे माहिती नसते. अनेक कंपन्यांना याबाबत समस्या निर्माण व्हायची आणि ते या लोकांना कामावर ठेवण्यास असमर्थ असायच्या. त्यामुळे भारतीय विद्यार्थी त्यांच्या देशात जाऊन मोठ्या कंपन्या उघडतात आणि अब्जाधीश बनतात असं ट्रम्प यांनी सांगितले.
ट्रम्प यांची घोषणा, काय आहे गोल्ड कार्ड?
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या रूपाने इमीग्रेशन इनीशियेटिव्ह सुरू करत गोल्ड कार्डची घोषणा केली आहे. ज्यातून ५० लाख डॉलरमध्ये कुणीही अमेरिकेचे नागरिकत्व घेऊ शकते. या नवीन योजनेतून जगभरातील उच्चभ्रू श्रीमंत वर्गाला अमेरिकेकडे आकर्षिक करणे हे आहे. त्यातून जास्तीत जास्त महसूल जमा करण्याचं उद्दिष्ट ट्रम्प सरकारचं आहे. भारतीय चलनात ४५ कोटी रूपयात अमेरिकेचे नागरिक बनू शकतात.