नवी दिल्ली : दक्षिण भारतातील अमेरिकन आणि इस्रायली वाणिज्य दूतावासावर हल्ला करण्याच्या कटात सामील असलेल्या कथित आरोपीविरुद्ध पुरावे सादर करण्याची विनंती भारताने मलेशियाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. हुसैन मोहम्मद सुलेमान (४७) नावाच्या या श्रीलंकन आरोपीला मलेशियात अटक करण्यात आली आहे.परस्पर कायदेशीर सहकार्य करार-२०१२ च्या अंतर्गत सुलेमान याच्याविरुद्धचे पुरावे सादर करण्याची विनंती राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी क्वालालम्पूरकडे केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. सुलेमान हा भारतात गुन्हेगारी कट, नकली नोटा बाळगणे, दहशतवादी कारवाया आणि दहशतवादी कारवायांसाठी पैसा गोळा करण्याच्या आरोपात वाँटेड आहे.चेन्नईतील अमेरिकन वाणिज्य दूतावास आणि बंगळुरूतील इस्त्रायली वाणिज्य दूतावासावर हल्ला करण्यासाठी मालदीवमधून दोन दहशतवाद्यांना भारताच्या एका समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला देण्यात आले होते, असे सुलेमान याने मलेशियाच्या तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अमेरिकी वकिलातीवर हल्ल्याचा कट
By admin | Published: August 18, 2014 3:03 AM