American Election : अमेरिकेच्या राजकारणात सध्या बराच गोंधळ सुरू आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर, आता डेमोक्रॅट पक्षाचा नेता कोण असेल, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे नाव सर्वात पुढे आहे, पण त्यांना आपल्याच पक्षातून काहींचा विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. कमला यांच्या नावाला बायडेन यांच्यासह माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा पाठिंबा आहे, पण बराक ओबामांचा पाठिंबा नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
जो बायडेन यांनी निवडणुकतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांनी निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली आहे, मात्र त्यांना अद्याप राष्ट्राध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार बनवण्यात आले नाही. विशेष म्हणजे, कमला यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी आजपासून फक्त 28 दिवसांची वेळ आहे. येत्या 19 ऑगस्ट रोजी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू होणार असून, त्यात उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काही दिवस शिल्लक आहे. 19 ऑगस्टपर्यंत कमला यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नाही, तर पक्षांतर्गत निवडणुकीतून उमेदवाराची निवड केली जाईल.
उमेदवार कसा निवडला जातो?अमेरिकेत कोणत्याही पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार हा पक्षाच्या प्रतिनिधींचा पाठिंब्यावर ठरतो. बायडेन यांना बहुतांश प्रतिनिधींचा पाठिंबा होता, पण आता कमला हॅरिस यांना सर्वांचा पाठिंबा नाही. त्यामुळे आता कमला यांना स्वतःला उमेदवार म्हणून सिद्ध करण्यासाठी प्रतिनिधींचा पाठिंबा मिळवण्याची कसरत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे हे काम त्यांना 19 ऑगस्टपूर्वी करावे लागणार आहे. असे न झाल्यास, 56 वर्षांत पहिल्यांदाच पक्षांतर्गत निवडणुका होतील. अशावेळी कमला हॅरिस यांना त्यांच्याच काही सहकारी नेत्यांच्या खुल्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते.