न्यूयॉर्क : अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या किराणा दुकानाच्या मालकाची त्याच्या घरासमोर गोळ््या घालून हत्या करण्यात आली आहे. कन्सासमध्ये एका भारतीय इंजिनीअरच्या हत्येपाठोपाठ ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हर्निश पटेल (४३) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. दक्षिण कॅरोलिना प्रांतातील लँकेस्टर काउंटीत पटेल यांचे एक दुकान आहे. दुकानापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर त्यांचे घर आहे. रात्री स्टोअर बंद करून ते आपल्या मिनीव्हॅनने घरी आले. त्यावेळी त्यांना मारेकऱ्याने गाठले. दुकान बंद केल्यानंतर सुमारे १0 मिनिटांत त्यांची हत्या झाली. त्यांच्या घराच्या बाहेरच त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचे कोणाशीही शत्रुत्व वा वैमनस्य नव्हते. त्यांची अशी कोणी हत्या करेल, असे कोणालाच वाटले नव्हते. मी त्यांच्या दुकानातूनच कायम खरेदी करीत असे. एखाद्याकडे पैसे नसले तरी ते त्याला खायच्या वस्तू देत असत. घडलेला प्रकार खूपच धक्कादायक आहे, असे निकोल जेम्स यांनी सांगितले. त्या दोघांची गेल्या काही वर्षांत मैत्रीच झाली होती. मॅरिओ सॅडलर हे तेथील रहिवासी म्हणाले की, मला नोकरी नसतानाच्या काळात पटेल यांनी आपल्याकडे काम कर, असे सुचविले होते. पटेल यांचे मित्र आणि शेजारीच दुकान असलेले दिलीपकुमार गज्जर म्हणाले की, पटेल अतिशय शांत, संयमी व आनंदी व्यक्तिमत्व होते. कुटुंबाचे भले व्हावे, यासाठी आपण इथे आलो, असे ते मला म्हणाले होते आणि खरोखरच त्यांनी कुटुंबाचे भलेच केले. शेरीफ बॅरी फेली यांनी हत्येमागे वांशिक मुद्दा असण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. भारतीय वंशाचे असल्यामुळे त्यांची हत्या झाली हे मी मानत नाही, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)कान्सास हत्या हे वैयक्तिक कृत्य ?वॉशिंगटन : कान्सास येथील हत्येकडे वैयक्तिक कृत्य म्हणून पाहिले जावे. अमेरिकी समाज अशा कृत्यांच्या विरोधात आहे, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर म्हणाले. कान्सास येथे ३२ वर्षीय श्रीनिवास कुचीभोटला या अभियंत्याची हत्या झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या हत्येचा निषेधही केला होता. जयशंकर आणि भारताच्या वाणिज्य मंत्री रीता तेवतिया यांनी ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि काँग्रेस नेत्यांशी बैठका घेऊन चर्चा केली. त्यानंतर जयशंकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या घटनेतील आरोपीस शिक्षा ठोठावली जाईल. हा खटला द्वेष गुन्हा म्हणूनच चालविला जाईल.
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची हत्या!
By admin | Published: March 05, 2017 1:34 AM