Media Tycoon Rupert Murdoch: प्रेम आंधळं असतं, प्रेमात वयाला मर्यादा नसते असं नेहमी बोललं जातं. आता याचा प्रत्यय देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. कारण प्रसिद्ध मीडिया टायकून रूपर्ट मर्डोक वयाच्या ९२ व्या वर्षी पाचव्यांदा लग्न करणार आहेत. येत्या जूनमध्ये ते इलेना झुकोवा यांच्याशी विवाह करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. खरं तर या आधी मर्डोक यांनी चार वेळा लग्न केलं असून, त्यांची होणारी पत्नी इलेना या एक निवृत्त शास्त्रज्ञ आहेत. रूपर्ट मर्डोक यांची ही सहावी एंगेजमेंट आहे. त्यांच्या भावी पत्नीचे वय ६७ वर्ष आहे.
माहितीनुसार, त्यांचे लग्न कॅलिफोर्नियातील त्यांच्या मोरागा व्हाइनयार्डमध्ये होणार आहे. यासंबंधीची निमंत्रणं यापूर्वीच पाठवण्यात आली आहेत. मर्डोक यांचं यापूर्वी चार वेळा लग्न झालं आहे. लक्षणीय बाब म्हणजे मर्डोक यांची होणाऱ्या पत्नीशी भेट ही त्यांची तिसरी पत्नी वेंडी डेंग यांनी आयोजित केलेल्या एका मोठ्या कौटुंबिक सोहळ्यात झाली होती. १४ वर्षांच्या नात्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी तिसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला.
रूपर्ट मर्डोक पाचव्यांदा करणार लग्न इलेना झुकोवा यांना ४२ वर्षांची एक मुलगी देखील आहे, जी रशियन-अमेरिकन कला संग्राहक म्हणून कार्य करते. इलेना यांचं पहिलं लग्न प्रीमिअर लीग फुटबॉल क्लब चेल्सीचे माजी मालक रोमन अब्रामोविच यांच्याशी झालं होतं. मर्डोक यांच्या एगेंजमेंटची बातमी त्यांनी आपल्या मीडिया साम्राज्यातून पायउतार होत असल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत आली.
रूपर्ट मर्डोक यांची कंपनी न्यूज कॉर्पकडे शेकडो स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय डिजिटल न्यूज आउटलेटची मालकी आहे, ज्यात वॉल स्ट्रीट जर्नल, फॉक्स न्यूज आणि स्काय न्यूज ऑस्ट्रेलिया, तसेच पुस्तक प्रकाशक हार्परकॉलिन्स यांचा समावेश आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती ८.९६ अब्ज आहे. तसेच न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, मर्डोक यांची होणारी पत्नी यापूर्वी लॉस एंजेलिसमध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठात आण्विक मधुमेह तज्ञ म्हणून काम करत होती. ती मूळची रशियाची आहे.