ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. अमेरिकेच्या दौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. मात्र तत्पूर्वीच मोदींसोबत व्यापार आणि गुंतवणूक संबंधित अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करावा, अशा आशयाचं एक पत्र अमेरिकन खासदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिलं आहे. अमेरिकेतल्या सत्ताधारी आणि विरोधक अशा रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षांच्या खासदारांनी एकत्रित हे पत्र लिहिलं आहे. तसेच भारतासोबत व्यापारी आणि गुंतवणुकीसंदर्भातील त्रुटी दूर करण्यासाठी अमेरिकेला यश आलं नाही, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील अनेक क्षेत्रांत आजही परदेशी व्यापारासंदर्भात असुरक्षिततेची भावना आहे. भारतीय कंपन्यांना आतासुद्धा अमेरिकन कंपन्यांशी व्यापार करणं सोपं नाही. 2017च्या वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार, ईज ऑफ डुइंग बिझनेसच्या 190 देशांच्या यादीत भारताला 130वं स्थान मिळालं आहे. केव्हिन ब्रँडी, रिचर्ड नील, ओरिन हेच हे खासदार म्हणाले, भारत आणि अमेरिकेत द्विपक्षीय आर्थिक संबंध फार मजबूत नाहीत. कारण भारत बाजारावरील आधारित सुधारणा करण्यास यशस्वी ठरला नाही. अनेक क्षेत्रांत जास्त किंमत, बौद्धिक संपत्तीला कमी संरक्षण, अनियमित आणि अपारदर्शी लायसेन्सिंग सारख्या अडचणी आहेत. कायद्याच्या रक्षणकर्त्यांनीही सहभागीदाराची कमी, आर्थिक, रिटेल आणि इतर मोठ्या क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीची मर्यादा तसेच डिजिटल ट्रेड, इंटरनेट सर्व्हिसमधील अडचणी दाखवून दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. तसेच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या 20 मोठ्या कंपन्यांच्या सीईओसोबत बैठक घेणार आहेत. भारत आणि अमेरिकेदरम्यान संरक्षणाची चिंता आणि भागीदारीत प्रगतीची आशा केली जात आहे.
अमेरिकन खासदारांचं मोदींसाठी ट्रम्प यांना साकडं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2017 9:57 PM