ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 11 - युनायटेड स्टेट्स नॅशनल सिक्युरिटी एजन्सी(NSA)ला परराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या हेरगिरीचं काम सोपवण्यात आलं असून, ज्यात भारतातल्या भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजपा या राजकीय पक्षाचा आणि पाकिस्तानमधल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचासुद्धा समावेश असल्याचा दावा व्हिसलब्लोअर वेबसाइट विकिलिक्सनं केला आहे. तसेच युनायटेड स्टेट्स नॅशनल सिक्युरिटी एजन्सीनं पाकिस्तानमधल्या मोबाईल नेटवर्कची सिस्टीम हॅक केल्याचा खुलासाही विकिलीक्सनं रिपोर्टमध्ये केला आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, अमेरिकेला फॉरन इन्टेलिजन्स सर्वेलन्स कोर्टानं (FISA) 2010मध्ये हेरगिरी करण्यासाठी प्रमाणपत्र बहाल केलं होतं. त्यानुसार जगभरातील 193 सरकारे आणि परदेशी गट, राजकीय संघटना आणि इतर घटकांची हेरगिरी करण्याची अमेरिकेला परवानगी मिळाली होती. मात्र ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांची हेरगिरी करण्याचा अधिकार अमेरिकेकडे नव्हता. त्याप्रमाणेच तुर्कस्थानातील उत्तरी गणराज्यांवरही अमेरिका हेरगिरी करत असल्याचं विकिलिक्सनं म्हटलं आहे. एनएसएला संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी, विश्व बँक आणि आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष यांसारख्या संस्थांच्या हेरगिरीचं काम देण्यात आलं होतं, असा दावाही विकिलीक्सनं केला आहे.