वॉशिंग्टन: आज(मंगळवार) अमेरिकेच्या मिशिगनमधील एका शाळेत(Michigan School Firing) अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने कथितरित्या हा गोळीबार केला, ज्यात 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर किमान 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर 15 वर्षीय हल्लेखोर विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूलही पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेनंतर इतर मुलांच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
ऑकलंड काउंटी शेरीफ कार्यालयाने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, डेट्रॉईटच्या उत्तरेस 40 मैल(65 किलोमीटर) अंतरावर असलेल्या ऑक्सफर्ड हायस्कूलमध्ये दुपारी गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. अमेरिकेतील 911 या आपातकालीन नंबरवर काही मिनीटातच शंभर कॉल आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, शाळेतील एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या घटनेत 16 वर्षीय मुलगा आणि 14-17 वर्षांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. तर, एका शिक्षकासह इतर आठ जण जखमी झाले.
15-20 गोळ्या झाडण्यात आल्या
अधिकाऱ्यांनी शाळेतून अनेक रिकामी काडतुसेही जप्त केली. सुमारे 15-20 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेत हल्लेखोर एकटाच होता. पण, अद्याप त्याच्या या गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. “मी ऑक्सफर्ड, मिशिगन घटनेत प्रियजन गमावल्याबद्दल अकल्पनीय दु: ख अनुभवत असलेल्या कुटुंबांसोबत उभा आहे. शाळेतील या दुःखद गोळीबाराच्या घटनेबाबत मी माझ्या टीमच्या संपर्कात आहे,"असे बायडन म्हणाले.
यापूर्वीही झालेत अशाप्रकारचे हल्लेअमेरिकेच्या इतिहासातील शाळेवर झालेला सर्वात प्राणघातक हल्ला एप्रिल 2007 मध्ये व्हर्जिनियाच्या ब्लॅक्सबर्ग येथील व्हर्जिनिया टेकवर झाला होता. त्यात शूटरसह 33 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर डिसेंबर 2012 मध्ये कनेक्टिकटमधील न्यूटाऊन येथील सॅंडी हूक प्राथमिक शाळेवर हल्ला झाला, ज्यामध्ये 28 लोक मारले गेले. त्यात 20 मुलांचा समावेश होता.